औरंगाबाद : काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज सोमवारी येथे पत्रकार परिषद घेऊन, शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना पराभूत करण्याकरिता औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांचा पराभव अटळ आहे. जालना लोकसभा मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार, याचा निर्णय आज रात्री जाहीर करू, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पराभव केल्याशिवाय मी माझ्या डोक्यावरील टोपी काढणार, असेही आ.सत्तार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील, भारतीय दलित पँथरचे संजय जगताप, जितसिंग करकोटक आदींची उपस्थिती होती. काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघावर यंदा राष्ट्रवादीने दावा ठोकत येथून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली होती. बर्याच प्रयत्नानंतर काँग्रेसला हा मतदारसंघ आपल्याकडेच राखण्यात यश आले. काँग्रेसने लोकसभेसाठी आ. सुभाष झांबड यांची उमेदवार म्हणून घोषणा केली;परंतु आ.झांबड यांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमधील अंतर्गत वादाला तोंड फुटले. नाराज झालेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत, बंड पुकारत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नंतर त्यांनी अर्ज माघारी घेत आपला पाठिंबा कोणाला हे नंतर सांगणार असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसात आ.सत्तार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात ते कुणाला पाठिंबा देणार, याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती. आज सोमवारी एका पत्रकार परिषदेत आ.सत्तार यांनी, खैरे यांचा पराभव करण्यासाठी आपण अपक्ष, उच्चशिक्षित व सर्व धर्मियांना सोबत घेऊन चालणारे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला. या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड यांचा पराभव अटळ आहे, असा दावाही आ. सत्तार यांनी केला. वेरूळ मठाचे शांतिगिरी महाराज यांच्यापाठोपाठ आ.सत्तार यांनीही जाधव यांना पाठिंबा जाहीर केल्याने निवडणुकीतील रंगत आणखी वाढली आहे.