एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे भाजपवर टीकास्त्र , मोठा भाऊ म्हणून आम्हाला संपवत आहेत !

Foto
छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मित्रपक्ष भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाने ठाकरेंच्या शिवसेनेचे हात-पाय तोडले; पण आमचे तर मुंडकंच तोडले आहे, असे विधान अब्दुल सत्तार यांनी केले. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिंदेसेना आणि भाजपात धुसफूस बघायला मिळाली. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून सत्तार यांच्या मुलानेही बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर सत्तार बोलत होते. 

एका मुलाखतीत अब्दुल सत्तारांना प्रश्न विचारण्यात आला की, अंबादास दानव म्हणाले की, 'शिवसेना संपवण्याचे काम भाजपा करत आहे. हात तोडायचा, मग पाय तोडायचा. हळूहळू सगळं सुरू आहे.' 

त्याचे हातपाय तोडले, पण आमचे तर मुंडकंच... 

दानवेंच्या या विधानावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, "आमचं तर मुंडकंच तोडून टाकलं आहे. त्यांचा तरी हातपाय तोडला, आमचे तर मुंडकं म्हणजे... तुम्ही बघितलं असेल की आमची जिल्हा परिषद गेली. आमची अनेक वर्षे सत्ता होती."

"महापालिकेमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असल्यापासून सत्ता होती, आता काय राहिले? माझा काही विरोध नाहीये, पण अंबादास दानवेंनी जी परिस्थिती सांगितली, त्यानुसारच आमच्या जिल्ह्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने वाटले जात आहे; शिवसेनेचे दोन तुकडे करायचे, एकाला हाताशी धरायचं, दुसऱ्यावर अन्याय करायचा. दुसऱ्याला तिसऱ्यावर अन्याय करायचा. अशा पद्धतीने आमचा मोठा भाऊच आम्हाला संपवत असेल, तर त्याला आता ईलाज नाही", असा आरोप अब्दुल सत्तारांनी भाजपावर केला. 

एकत्र येण्याचा एकनाथ शिंदेंनी निर्णय घ्यावा
शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आले पाहिजे असे अंबादास दानवे यांना वाटते, तुम्हालाही वाटते का? या प्रश्नावर बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, "आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, आपल्याला एकत्र यायचे आहे, तर त्याबद्दल कोणाला विचारण्याची गरजच नाही. माझा नेता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल."

सत्तारांच्या मुलाची बंडखोरी
छत्रपती संभाजीनगर-जालना हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपाच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे शिंदेसेनेत नाराजी असल्याचे समोर आले. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून भाजपाने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली. तर त्यांच्या विरोधात आता शिंदेंसेनेचे समीर सत्तार यांनी बंडखोरी करत अर्ज भरला आहे. 

समीर सत्तार आधीपासूनच या जागेसाठी आग्रही होते. त्यांनी तयारीही केली होती, पण वाटाघाटीत ही जागा भाजपाने स्वतःकडे खेचून घेतली. दुसरीकडे या मतदारसंघात महाविकास आघाडीत असलेल्या उद्धवसेनेने देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी दिली आहे.