औरंगाबाद: बीड बायपास वरील देवळाई भागात असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएमच चोरट्यानी लंपास केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. या एटीएममध्ये सुमारे २५ लाख रुपयांची रोकड होती.चोरट्यानी स्कॉर्पियो वाहनातून हे एटीएम पळविले आहे.
रात्री दीड वाजेच्या सुमारास देवळाई भागातील एटीएमवर एका स्कॉर्पिये वाहनातून आलेल्या चोरट्यानी सुरुवातीला एटीएमच्या कॅमेरावर स्प्रे मारला व त्यानंतर भिंतीवरील सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. एटीएम फोडुन रोकड काढण्याचा प्रयत्न चोरट्यानी केला. मात्र एटीएम फुटत नसल्याचे पाहून चोरट्यानी चक्क रोकडने भरलेले एटीएमच पळविले. दरम्यान, दरवाज्यातून बाहेर निघत नसल्याने चोरट्यानी एटीएम सेंटर च्या काचा फोडून एटीएम बाहेर काढले. यावेळी मोठा आवाज झाल्याने शेजारील एका तरुणाने बाहेर येऊन पाहिले असता एक स्कॉर्पिये वाहन सुसाट वेगात जाताना दिसली. ही सर्व माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
चोरी झालेल्या एटीएम वर यापूर्वी देखील वर्षभरापूर्वी चोरीचा प्रयत्न झाला होता त्या नंतर देखील सुरक्षा रक्षक नेमण्यात आले न्हवते सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यानी संधी साधली.या एटीएममध्ये २५ लाखापेक्षा अधिक रक्कम होती अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ राहुल खाडे यांनी दिली