छत्रपती संभाजीनगर: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर ६ ते ७ हजार लोकांच्या उपस्थितीत भव्य आंदोलन केल्यानंतर, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आज पहाटे ५ वाजता छत्रपती संभाजीनगर इथं दाखल झाले. अमेरिकेतून थेट भारतात परतत दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांविरोधात रणशिंग फुंकणारे दीपके वाळूज महानगर येथील आपल्या निवासस्थानी पोहोचताच समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके यांनी यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करत देशव्यापी करण्याचा थेट इशारा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरात आल्यानंतर पहिली प्रतिक्रिया देताना अभिजीत दीपके म्हणाले, कॉकरोच जनता पार्टीने उभारलेले दिल्लीतील आंदोलन पूर्णपणे यशस्वी झाले आहे. नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात झालेल्या या आंदोलनात तब्बल ६ ते ७ हजार लोक सहभागी झाले होते. मात्र, ज्या मुख्य मागणीसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो, ती मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आमचा हा लढा इथेच थांबणार नाही, तर तो पुढेही सुरूच राहील.
केंद्रीय मंत्र्यांना थेट आव्हान देत दीपके पुढे म्हणाले, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही. जंतरमंतरनंतर आता हे आंदोलन आम्ही संपूर्ण देशव्यापी करणार आहोत. या पुढील देशव्यापी आंदोलनाची रूपरेषा आणि तारीख लवकरच अधिकृतपणे जाहीर केली जाईल.
घराला पोलिसांचा वेढा; औक्षण करून स्वागत
अभिजीत दीपके आज पहाटे वाळूज महानगर येथील आपल्या निवासस्थानी पोहोचले. त्यांच्या आगमनानंतर कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे औक्षण करत स्वागत केले. मात्र, दीपके यांनी कॉकरोच जनता पार्टी स्थापन केल्यापासून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला सातत्याने धमक्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कोणतीही जोखीम न पत्करता दपके यांच्या घराभोवती कडेकोट बंदोबस्त लावला आहे.













