गावागावात तलाठी कार्यालय सुरू करण्याची काशिनाथ जाधव यांची मागणी
फुलंब्री, (प्रतिनिधी) तालुक्यातील अनेक गावांमध्ये तलाठी नियमितपणे उपस्थित राहत नसल्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना विविध महसुली कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे. याबाबत तहसीलदार यांना निवेदन देत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ७/१२ उतारा, फेरफार, पीक नोंदणी, उत्पन्न दाखले, वारस नोंद, ई पीक पाहणी आदी महत्त्वाची कामे वेळेत होत नसल्याने शेतकऱ्यांना वारंवार तलाठी कार्यालयाचे फेरे मारावे लागत आहेत. अनेक तलाठी कार्यालये शहरात असल्याने ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना मोठा आर्थिक व
मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
तलाठी गावात उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची कामे प्रलंबित राहत असून दिवसेंदिवस नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक गावात किंवा सज्जामध्ये तलाठी कार्यालय सुरू करण्यात यावे तसेच तलाठ्यांनी निश्चित वेळेत उपस्थित राहून नागरिकांची कामे तत्परतेने करावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याशिवाय गावनिहाय उपस्थिती नोंद ठेवून नागरिकांना वेळेत सेवा मिळावी, यासाठी महसूल प्रशासनाने कठोर सूचना द्याव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना काशिनाथ जाधव छत्रपती संभाजी नगर तसेच प्रगतिशील शेतकरी आनंदा भोकरे इतर शेतकरी नागरिकांनी व्यक्त केली आहे.












