डॉ.आकांक्षा देशमुख खुन प्रकरण: एमजीएम प्रशासनाची मुजोरी, सचिव म्हणाले अशा अनेक घटना होतच असतात

Foto

औरंगाबाद- डॉ.आकांक्षा देशमुख हीच्या हत्येला सहा दिवस उलटूनही आरोपींचा शोध पोलिसांना लागलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांची भेट घेतली. मात्र निवेदन द्यायला आलेल्या पदाधिकाऱ्यावंरच कदम संतापले. असे खुन होत असतात, आणि अनेक आरोपी मोकाट फिरतात असे संतापजनक वक्तव्य कदम यांनी केल्याने कदम आणि निवेदन देण्यासाठी आलेल्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.

एमजीएममध्ये फिजीओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या आकांक्षा देशमुख हीचा दि.११ हॉस्टेलच्या रुममध्ये घूसून गळा दाबून खुन करण्यात आला होता. त्यामुळे अनेक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत एमजीएमच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे  आकांक्षाला न्याय मिळावा यासाठी एमजीएम महाविद्यालयाच्या परिसरात सोमवारी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी एमजीएम प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत परिसर दणादून सोडला.

बैठकीत नेमके काय घडले

एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम यांना निवेदन देण्यासाठी अभाविपचे पदाधिकारी गेले होते. त्यावेळी चर्चा सुरु होत असतांना, एवढी सुरक्षा व्यवस्था असताना आकांक्षाचा खुन होतोच कसा? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याला उत्तर देतांना कदम म्हणाले ‘असे अनेक गुन्हे होत असतात, ज्यात आरोपी मोकाट फिरतात’ कदमांच्या या उत्तरामुळे पदाधिकाऱ्यांचा संताप वरचढ झाला. म्हणजे तुम्हाला अजून गुन्हेगार तयार करायचे आहेत का. असा कठोर सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीमुळे ही बाचाबाची थांबली.

पृथ्वीराज चव्हाणांना प्रकरण दाबण्यासाठी बोलावले

रविवारी एमजीएममधील रुख्मिनी सभागृहात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे राफेल प्रकरणावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. मात्र चव्हाणांना एमजीएममध्ये बोलावून या प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे असा गंभीर आरोप अभाविपने केला. ज्या महाविद्यालयात एवढी मोठी घटना घडली, त्या महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री येतातच कसे? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.