शिक्षणाचा ताण, बाजारीकरण अन् फोफावलेला जातीवाद... साहिल वाकोडे मृत्युप्रकरणी राज ठाकरेंची परखड प्रतिक्रिया

Foto
मुंबई : विद्यार्थी साहिल वाकोडे या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नुकतीच आयआयटी मुंबईमध्ये घडली होती. परीक्षेत कॉपी करण्यासाठी एआयचा वापर करताना पकडला गेल्याने साहीलने टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र शिक्षणसंस्थेत सुरू असलेल्या जातीय छळाला वैतागून साहीलने टोकाचं पाऊल उचल्याचा गंभीर आरोप साहिलच्या पालकांनी केला  आहे. या घटनेमुळे मुंबई आयआयटीसह एकूणच शिक्षण क्षेत्र ढवळून निघालं आहे. तसेच त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता या प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली असून, गेल्या काही वर्षांत फोफावलेल्या जातीवादासह शिक्षणाचं बाजारीकरण, वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांवर येत असलेल्या दबावाबाबत त्यांनी परखड भाष्य केले. तसेच या सगळ्या प्रकरणात एक तरुण मुलगा आपल्यातून गेला, त्याला थेट टोकाचं पाऊल उचलण्याचा मार्गच का स्वीकारावासा वाटला यावर कोणीच बोलताना दिसत नाहीये, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

या संदर्भात सोशल मीडियावर  शेअर केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी लिहिले की,  आयआयटी मुंबईमध्ये साहिल वाकोडे या वीस वर्षांच्या विद्यार्थ्याने जीवन  संपवल्याची केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. परीक्षेदरम्यान त्याने मोबाईल आणि चॅटजीपीटीचा वापर केल्याचा आरोप आयआयटी प्रशासनाने सुरुवातीला केला. हा आरोप तपास पूर्ण होण्याआधी जाहीर करणं अयोग्य होतं, हे मान्य करत प्रशासनाने नंतर माफीही मागितली. दुसरीकडे साहिलच्या कुटुंबीयांनी जातीय छळाचे आरोप केले आहेत. त्या आरोपांवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. प्राध्यापकांनीही आपली बाजू मांडली आहे. या सगळ्या प्रकरणात एक तरुण मुलगा आपल्यातून गेला, त्याला थेट आत्महत्येचा मार्गच का स्वीकारावासा वाटला यावर कोणीच बोलताना दिसत नाहीये.

राज ठाकरे यांनी पुढे लिहिले की,  एखादा विद्यार्थी परीक्षेत गैरप्रकार करत असेल, तर त्याला रोखणं आणि त्याच्यावर नियमानुसार कारवाई करणं हे प्राध्यापकांचं कर्तव्यच आहे. पण आरोप सिद्ध होण्याआधी मृत विद्यार्थ्याला गुन्हेगार ठरवणं योग्य नाही. त्याचप्रमाणे जातीय छळाचा आरोप झाला म्हणून चौकशी पूर्ण होण्याआधी प्राध्यापकांना दोषी ठरवणंही योग्य नाही. पण या सगळ्याचा कुठेच विचार होत नाही. कारण या विषयांत आता जात हा मुद्दा पुढे आणून, एका वीस वर्षांच्या मुलाला एका प्रसंगानंतर आपल्या आयुष्याचे सगळे मार्ग संपले आहेत, असं का वाटलं असेल? यावर बोलायचं नाहीये. विचार करायचा नाहीये. 

मी अनेकदा माझ्या भाषणांमध्ये सांगितलं आहे की २००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली आहे की आपल्या शेजारी शाळेत बसणारा विद्यार्थी कुठल्या जातीचा आहे हे सांगू लागलेत, वर्षानुवर्षे एकत्र डबा खाणारे ऑफिसमधले कर्मचारी जातीच्या नजरेतून एक दुसर्‍यांकडे पहायला लागलेत. आणि हे इतकं विषारी होत चाललं आहे की हे आता आयआयटीपर्यंत पोहचलं आहे. पंडित नेहरूंनी आयआयटीचं वर्णन आधुनिक भारताची मंदिरं असं केलं होतं त्या आयआयटीत विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली, एक सहकारी आपल्यातून गेला यापेक्षा हे सगळं जातीतून घडलं हा पैलू पुढे यावा, यासारखं दुर्दैव नाही.