सर्व मागण्या मान्य करा अन्यथा सरकारची जिरवणार ! मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा थेट इशारा

Foto
जालना  : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा अशा राज्यातील सर्व भागांमध्ये मराठ्यांवर आणि कुणबींवर अन्याय होत असल्यास एकजुटीने आणि आक्रमकपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच २९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होणार्‍या आंदोलनाची तयारी करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, खानदेश, विदर्भ, मराठवाडा जिथे जिथे मराठ्यांवर, कुणबीवर अन्याय होईल, त्यांनी एक जीवाने आणि आक्रमकपणे उठायचे आणि २९ ऑगस्टच्या अंतरवालीच्या आंदोलनाची तयारी करायची, ही विनंती आहे. कुणाच्या दबावाला बळी पडू नका. घाबरू नका. शांत बसू नका, आक्रमक व्हा, असे त्यांनी म्हटले.

यावेळी आपल्या आगामी दौर्‍याबाबत माहिती देताना जरांगे पाटील म्हणाले की, २० ते २५ ऑगस्टदरम्यान विदर्भ, मराठवाडा दौरा करणार आहे. २९ ऑगस्टला उपोषण करणार आहे. माझं समाजापुढे जे कर्तव्य होतं, ते मी पूर्ण केलं. राज्यातल्या सगळ्या अभ्यासकांना मी काल बोलावले होते. २९ ऑगस्टला उपोषण करायचे आहे. पुढचे जीआर कसे काढायचे, मागच्या जीआरमध्ये काय सुधारणा करायची का, काय-काय करायचं यावर मी माझे कर्तव्य पार पाडले, असे त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, उद्या मला मराठा समाज म्हटला असता की, अभ्यासक काय विरोधात बोलतात, ते नेहमी म्हणतात आमचं ऐकून घेत नाही. आम्हाला दुरुस्त्या सांगायच्या होत्या, त्या ऐकून घेतल्या नाहीत. म्हणून मी त्यांना निवांत १६ तारखेला या असे सांगितले होते. महाराष्ट्र पुढे दिसले की, यांना गोरगरिबांशी एकनिष्ठ राहायचे नाही. या लोकांना फक्त मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांचेच असून काही अभ्यासक, समन्वयक यांना बोलायचे आहे, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता इथून पुढे त्यांना मराठ्यांच्या प्रश्नाविषयी बोलता येणार नाही.

...तर सरकार पाडणार
कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरही जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. ते म्हणाले, ५८ लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी पाहिजे. एकही नोंद कमी केली तर सरकार पाडणार. भुमरे, शिरसाट, बावनकुळे यांनी मराठ्यांचे तळतळाट घेतला. याचिका टाकल्या, आता फोटो बाहेर येत आहेत.

फडणवीस, उद्रेक होईल असे वागू नका
वैधता प्रमाणपत्रांच्या तपासणीच्या मुद्द्यावर त्यांनी फडणवीसांना इशारा देत म्हटले, ज्या वैधता झाल्या आहेत, त्या पुन्हा तपासणीसाठी, सुनावणीसाठी घेतल्या असे मला कळाले. मराठेच की सगळ्या जातीचे घेतले? फडणवीस, उद्रेक होईल असे वागू नका. तुमच्या विरोधात व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी सर्वांत भयंकर चीड आहे. सत्ता कधी निसटेल कळणार नाही. हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र कसे देणार, असा सवालही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. तसेच सातारा, कोल्हापूर आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅझेटचे जीआर देण्याची मागणी त्यांनी केली.