वेरूळच्या चांगोबा घाटात अपघात

Foto
 स्मार्ट सिटी बसची लक्झरीला धडक, ४० भाविक  बचावले

बाभळीच्या झाडामुळे बस दरीत कोसळण्यापासून वाचली; मोठी जीवितहानी टळली

खुलताबाद, (प्रतिनिधी) : तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराकडे जाणार्या वेरूळ घाटातील धोकादायक चांगोबा वळणावर गुरुवारी (दि. ४) सकाळी ६ वाजेच्या सुमारास अपघात घडला. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी बसने कर्नाटकहून आलेल्या भाविकांच्या लक्झरी बसला जोरदार धडक दिली.

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, ४० भाविकांसह ५० हून अधिक प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला आहे. 

बाभळीच्या झाडामुळे टळला मोठा अनर्थ :
कर्नाटक राज्यातील ४० भाविकांना घेऊन एक लक्झरी बस (क्रमांक अठ ०६० ७१८५) श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी वेरूळकडे जात होती. याच वेळी वेरूळकडून खुलताबादच्या दिशेने जाणारी स्मार्ट सिटी बस (क्रमांक एमएच २० २८०७) चांगोबा वळणावर आली असता, दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेनंतर स्मार्ट
सिटी बस रस्त्याखाली उतरली. मात्र, रस्त्यालगत असलेल्या बाभळीच्या झाडांमध्ये ही बस अडकल्याने ती सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळण्यापासून बालंबाल वाचली. यामुळे एक मोठा अनर्थ टळला.

या अपघातात लक्झरी बसचे चालक संतोष अप्पासाहेब बोरगले (रा. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने, लक्झरी बसमधील सर्व ४० भाविक सुरक्षित व सुखरूप आहेत.

वाहतूक काही काळ विस्कळीत अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तात्काळ मदतकार्य राबविले. या अपघातामुळे घाटात काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस रस्त्यावरून बाजूला काढण्यात आली आणि पोलिसांनी वाहतूक पूर्ववत सुरळीत केली.