हतनूरजवळ अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Foto
कन्नड, (प्रतिनिधी) : वाढदिवसाचा आनंद साजरा केल्यानंतर काही तासांतच काळाने घाला घातल्याची घटना हतनूर येथे घडली. राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा परिषद शाळेजवळ उड्डाणपुलाच्या सुरवातीला दुचाकी दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार साईराज योगेश बिडवे (वय २०) याचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी (ता. आठ) मध्यरात्री सव्वाबाराला हा अपघात झाला.

शुक्रवारी (दि. ७) साईराजचा २० वा वाढदिवस होता. दिवसभर मित्र आणि नातेवाइकांसोबत वाढदिवस साजर करून साईराज हा कञ्डहून दुचाकीवरून हतनूरकडे येत होता. राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ अंधारामुळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा व दुभाजकाचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याची दुचाकी थेट दुभाजकावर जाऊन धडकली. या भीषण धडकेत डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नातेवाइक व मित्रांनी त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात साईराज बिडवेला दाखल केले. 

परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. साईराज द्वितीय वर्षात शिकत होता. तो योगेश बिडवे यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई वडील, आजी बहीण असा परिवार आहे. हतनूर येथील उड्डाणपुलावरील पथदिवे पाच महिन्यांपासून पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण उड्डाणपूल अंधारात बुडालेला असतो. 

अंधारामुळे महामार्गावरून गावाकडे वळताना दुभाजकाचा अंदाज येत नसल्याने येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच साईराजचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे