विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप; अधिवेशन काळात रिक्त राहणार पद?

Foto
 नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूर येथे सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात पहिल्यांदाच विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहेत. जाणुनबुजून सरकार विरोधी पक्षनेतेपद रिक्त ठेवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला तर विरोधी पक्षनेते निवडीचा अधिकार मुख्यमंत्री किंवा सरकारकडे नाहीत तो अधिकार विधिमंडळाचे अध्यक्ष, सभापतींचा आहे असं सत्ताधार्‍यांकडून सांगण्यात येते. दुसरीकडे काँग्रेसने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सतेज पाटील यांचे नाव पुढे केले आहे. काँग्रेस शिष्टमंडळ सभापती राम शिंदे यांची भेट घेणार आहे.

याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, १९८० मध्ये भाजपाचे १४ आमदार होते, १९८५ मध्ये १६ आमदार होते तेव्हाही विरोधी पक्षनेते बनवण्यात आले होते. नियत नसेल तर त्याला काही बोलू शकत नाही. संविधानिक पद रिक्त ठेऊन तुम्ही कामकाज करताय हा मनमानी कारभार आहे. तुम्हाला विरोधी पक्षनेतेपद नियुक्त करायला काय दुखणे आहे, आम्ही नाव दिले आहे. जो काही असेल तो निर्णय घ्या. लोकशाहीवर आधारित सरकार चालवायचे नसेल तर त्यांना संविधानाप्रमाणे सरकार चालवायचे नाही असा अर्थ होतो. रेटून कारभार करत जनतेला न्याय द्यायचा नसेल. सरकारच्या गैरप्रकारावर कुणी अंकुश ठेवू नये असं वाटत असेल तर त्यांनी करू नये असा टोला त्यांनी लगावला.

दुसरीकडे शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या वादावर भाष्य केले आहे. विरोधी पक्षनेता म्हणजे सार्वभौम्य नसतो. ५८ आमदार विरोधात असताना हे घाबरतायेत कशाला? विरोधी पक्षनेत्याचा निर्णय हा अध्यक्ष, सभापतींचा असतो. तो शासनाचा किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार नाही. अध्यक्ष, सभापतींनी या अधिवेशन काळात त्यांची भूमिका निश्चित करतील असं सांगितले आहे परंतु सभागृहात विरोधकांचे एक सदस्य असो वा ५८ सदस्य..जेवढा विरोधी पक्षनेत्याला बोलण्याचा अधिकार असतो तेवढा इतर सदस्यांना असतो. २३७ संख्याबळ महायुती सरकारकडे आहे त्यामुळे विरोधक घाबरून काही ना काही पळवाटा शोधत आहेत. २०१९ ते २०२४ या काळात केंद्रात काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद नव्हते. मात्र त्यांनी त्यांची भूमिका चांगली पार पडली म्हणून २०२४ मध्ये त्यांचा विरोधी पक्षनेता झाला. तशीच राज्यातील विरोधकांनी भूमिका घेतली तर २०२९ ला निश्चित विरोधी पक्षनेता सभागृहात दिसेल असा टोला मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरोधकांना लगावला.

उदय सामंत अन् भास्कर जाधव यांच्यात टोलेबाजी

दरम्यान, भास्कर जाधव हे आक्रमक आहेत त्यामुळे त्यांची आक्रमकता पक्षावरच उलटू नये म्हणून जाधव यांच्या समाधानासाठी विरोधी पक्षनेतेपदाचे पत्र देण्यात आले. त्यांचे समाधान करण्याचा हा प्रयत्न होता. परंतु भास्कर जाधव यांनाच विरोधी पक्षनेते बनवतील का हा प्रश्न आहे. विरोधी पक्षनेतेपद निवडीचा अधिकार सभापती, अध्यक्षांचा आहे. दोघेही निर्णय घेण्यास सक्षम आहेत. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील असं सांगत मंत्री उदय सामंत यांनी जाधवांना टोला लगावला. तर आपल्या लोकशाहीत सत्ताधारी जेवढे महत्त्वाचे तेवढा विरोधी पक्षही महत्त्वाचा आहे. परंतु हे सत्ताधारी मुजोरी आहे. यांना राज्य घटना मान्य नाही. विरोधी पक्षनेतेपदाची निवड जाणीवपूर्वक लांबणीवर टाकल्या जातायेत कारण या लोकांचा लोकशाहीवर विश्वास नाही असा आरोप जाधव यांनी केला. त्याशिवाय खुर्चीसाठी कोण काय करते हे मुख्यमंत्र्यांनी स्वत: सांगितले आहे. वेष बदलून, कान टोपी घालून, हुडी घालून उद्धव ठाकरे सरकार पाडले हे सांगितले आहे. त्यामुळे सत्तेचा मोह तुमच्या इतका कुणाला नाही असा टोला जाधव यांनी उदय सामंत यांना लगावला.