छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पडेगाव परिसरातील जमिनीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही त्या जागेचा मालक, सोसायटीचा चेअरमन मीच आहे, तुम्हाला प्लॉट घ्यायचे असतील तर मला संपर्क करा, असे म्हणत तिघांच्या मदतीने आठ जणांची ५८ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करणार्या मुख्य आरोपीला डायल ११२ च्या अंमलदाराने शिताफीने ताब्यात घेतले. ही कारवाई दि. २४ रोजी बेगमपुर्यातील हनुमान टेकडी ते चाऊस कॉलनी रस्त्यावर केली. मुकेश सुखबीर लाहोट (रा. पहाडसिंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे.
कचरू केशवराव नागरे (वय ५२, रा. पडेगाव) यांनी फिर्याद दिली होती. लाहोटसह इतर तिघांविरोधात छावणी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. ४ महिन्यांपासून मुकेश हा फरार होता. नागरे यांच्या फिर्यादीनुसार पडेगावातील गट क्रमांक दहामधील अडीच एकर जमीन ही द कोऑपरेटीव्ह पिंगरी सोसायटीच्या नावावर असून, त्या सोसायटीचा मी चेअरमन आहे. सर्व खरेदी-विक्रीचे अधिकार माझ्याकडेच आहेत. तुम्हाला किंवा कोणाला प्लॉट घ्यायचे असल्यास मला फोन करा, असे सांगितले. सर्व प्लॉट विक्रीनंतर प्लॉटधारकांना एनए- ४४ चा लेआउट मंजूर करून नवीन सोसायटी बनवून देऊ, असे सांगत फिर्यादीसह आठ जणांची आरोपींनी ५८ लाख ४० हजार १३५ रुपयांची फसवणूक केली होती.










