छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) तुझे लग्न कसे होते, तेच बघून घेतो, अशी धमकी देत एका माथेफिरू तरुणाने तरुणीच्या घरात घुसून तिच्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना गारखेड्यातील गणेशनगर भागात घडली. पीडित तरुणीचा विवाह ठरल्याचा राग मनात धरून आरोपीने केवळ मारहाणच केली नाही, तर तरुणीच्या वडिलांच्या हाताचा जोरात चावा घेत त्यांना जखमी केले. रविवारी (दि. २१) रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या थरारक प्रकारानंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आरोपी कपिल गाडगीळ (२५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तरुणीच्या ५० वर्षीय वडिलांनी फिर्याद दिली. त्यांच्या मुलीचे लग्न ठरले असून, घरात लग्नाची तयारी सुरू होती. रविवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या जवळच्या गल्लीत राहणारा कपिल गाडगीळ हा
त्यांच्या गल्लीत आला. त्याने फिर्यादी यांच्या घरातील महिलांना मुलीला बाहेर बोलावण्यास सांगितले.
ही माहिती समजताच मुलीच्या वडिलांनी कपिलला जाब विचारला. त्यावर कपिलने मुलीचे लग्न कसे होते ते बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यानंतर कपिलने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या मोबाइलवर सतत कॉल करून शिवीगाळ करत त्रास देण्यास सुरुवात केली. मुलीशी बोलणे करून द्या, असा तगादा लावला. त्याच्या त्रासाला कंटाळून कुटुंबाने दोन वेळा ११२ या क्रमांकावर कॉल करून पोलिसांना बोलावले. मात्र, पोलिस येताच तो गल्लीतून पळून जायचा. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास कपिलने पुन्हा फिर्यादीच्या घरी जाऊन वाद घातला. तिच्या वडिलांना मारहाण करत हाताच्या दंडाला चावा घेतला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions