छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश वटला नाही, तसेच कायद्यातील तरतुदीनुसार प्रक्रियेचा अवलंब करूनही आरोपीने न वटलेल्या धनादेशाचे पैसे निर्धारित वेळेत फिर्यादीस दिले नाहीत. त्यामुळे दाखल तक्रारीच्या अनुषंगाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डॉ. ए. एस. भासरकर यांनी पराक्राम्य अभिलेख कायद्याच्या कलम १३८ अन्वये आरोपी सुवर्णा संजय मनगटे हिला नुकताच १५ लाख रुपये दंड ठोठावला. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला ६ महिने कारावास भोगावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे.
दंडाची रक्कम वसूल झाल्यास अपिलाच्या मुदतीनंतर भरपाई म्हणून तक्रारदारास देण्याचेही आदेशात म्हटले आहे. सुवर्णाने तक्रारदार सचिन रगडे यांच्याकडून एक महिन्यात परत करण्याच्या अटीवर १० लाख रुपये एका महिन्याच्या बोलीवर घेतले होते हातउसने घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी त्या महिलेने दिलेला धनादेश तिच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने परत आला. तक्रारदाराने अॅड. रवींद्र दाभाडे यांच्यामार्फत आरोपीला कायदेशीर नोटीस बजावून १५ दिवसांचा वेळ दिला. मात्र, तिने वेळेत रक्कम परत केली नाही. म्हणून पराक्राम्य अभिलेख कायद्याच्या कलम १३८ अन्वये न्यायालयात तक्रार दाखल होती. अॅड. दाभाडे यांना अॅड. उमेश दाभाडे यांनी सहकार्य केले.










