मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादरच्या शिवाजी पार्क येथील पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकर याला २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी पावसकरला आज शिवडी न्यायालयात हजर केले होते . आरोपी हा ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे.
शिवाजी पार्क येथे उभारलेल्या स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. मुंबईत विविध जिल्ह्यात शिवसैनिकांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. तर, राजकीय नेत्यांनीही आपली प्रतिक्रिया देत आरोपीच्या अटकेची मागणी केली होती. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही पुतळास्थळाची पाहणी करत 24 तासांत आरोपीला बेड्या ठोका असे म्हटले होते. तर, उद्धव ठाकरे यांनीही पाहणी करत पोलिसांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर रात्री पोलिसांनी अटक केली होती.
आज पोलिसंनी आरोपीला कोर्टात हजर केले.आरोपीला त्याची बाजू मांडण्यासाठी वकील नसल्याने असिस्टंट लिगल अॅन्ड डिफेन्स कौन्सिलकडून वकील देण्यात आला. ॲड. सुमेधा कोकाटे यांनी आरोपीची बाजू मांडली. हा वकील देण्यासाठी कोर्टाने सहकार्य केले. न्यायमूर्ती व्हि. व्हि. कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी पार पडली.
मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणातील आरोपी उपेंद्र पावसकर हा विक्षिप्त असल्यातचे सांगत शेजारी राहणाऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. कुटुंबातील सदस्यांना गेले अनेक वर्ष मारहाण करत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. त्यामुळे उपेंद्र पावसकर हा गेले तीन वर्ष एकटाच राहत होता. उपेंद्र पावसकर याला प्रभादेवी येथून ताब्यात घेतले . तीन वर्षांपासून प्रभादेवी येथे राहत होता.
ठाकरेंच्या सेनेकडून सुशोभीकरण करण्यात येणार
रंगफेक झाल्याच्या घटनेनंतर मीनाताई ठाकरे पुतळ्याचे ठाकरेंच्या सेनेकडून सुशोभीकरण केले जाणार आहे. CCTV बसण्यासोबत पुतळ्याचे सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे. स्व. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती मुंबई यांच्या वतीने पालिकेला पत्र देण्यात येणार असून सुशोभीकरणाची परवानगी घेण्यात येणार आहे. यानंतर पक्षाच्या वतीने मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पुतळ्याची डागडुजी देखील करण्यात येणार आहे. पुतळ्याच्या वरील शेड जीर्ण झाल्याने पुतळ्याचे सुशोभीकरण करुन शेड देखील वाढवण्यात येणार आहे.