छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): हसूल पोलीस ठाण्यात वर्षभरापूर्वी दाखल झालेल्या बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) प्रकरणातील फरार आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. अत्यंत क्लिष्ट अशा तांत्रिक तपासाच्या जोरावर, दोन दिवसांच्या अथक पाठलागानंतर हसूल पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तत्पूर्वी, पोलिसांनी या प्रकरणातील पीडितेला ताब्यात घेतले होते.
हसूल पोलीस ठाण्यात १ मे २०२५ रोजी 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी आणि पीडिता शहरातून पसार झाले होते. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीने स्वतःचा मूळ मोबाईल कायमचा बंद ठेवला होता. तो केवळ वाय-फाय किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ठरावीक आणि विश्वासू व्यक्तींशी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संपर्क साधत असे. यामुळे पोलिसांना त्याचे अचूक लोकेशन मिळवण्यात वारंवार अडथळे येत होते.
पीडितेचा पालकांकडे जाण्यास नकार
न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल असल्याने पोलिसांनी पीडितेला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पीडितेला तिच्या पालकांकडे जाण्याची इच्छा आहे का, अशी विचारणा केली असता तिने पालकांकडे जाण्यास नकार दिला. दरम्यानच्या काळात पीडितेने बाळाला जन्म दिला असून ते बाळ आता दोन महिन्यांचे आहे. न्यायालयाने कायदेशीर बाबींचा विचार करून पीडितेला बालकल्याण समितीसमोर हजर करण्याचे आदेश दिले, तसेच तिच्या दोन महिन्यांच्या बाळाची काळजी घेत तिला महिला वसतिगृहात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
गुन्हे शाखेच्या मदतीने लागला छडा
पोलिसांनी सीडीआर-एसडीआर विश्लेषण, लोकेशन ट्रॅकिंग आणि तांत्रिक तपासाचा वापर केला. पसार झाल्यानंतर दोघे सुरुवातीला बीड आणि नंतर पुण्याच्या मांजरी परिसरात लपले. पुण्यात आरोपी जेसीबी चालक म्हणून काम करत होता. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते पुन्हा छत्रपती संभाजीनगरातील पुंडलिकनगर भागात नाव बदलून राहत होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक जयश्री कुलकर्णी, पोलीस हवालदार विठ्ठल मानकापे, पोलीस अंमलदार रामदास गव्हाणे, हिरा चिंचोलकर आणि पूनम परदेशी यांच्या पथकाने केली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













