सिल्लोड न्यायालयाचे ३.१९ लाख अदा करण्याचे आदेश
सिल्लोड, (प्रतिनिधी): सिल्लोड येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम श्रेणी (न्यायालय क्र. २) यांनी धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात आरोपी शेख आवेस शेख कय्यूम याला परक्राम्य लिखत अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवत फिर्यादी शेख वसीम शेख गुलाम हुसेन यांच्या बाजूने निकाल दिला आहे. न्यायालयाने आरोपीस एका महिन्याच्या आत फिर्यादीस एकूण ३ लाख १९ हजार अदा करण्याचे आदेश दिले आहेत. निर्धारित मुदतीत रक्कम जमा न केल्यास आरोपीला नऊ महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हा निर्णय ९ जुलै २०२६ रोजी देण्यात आला.
न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने व्यवसाय विस्तारासाठी फिर्यादीकडून २ लाख २० हजार उसने घेतले होते. ही रक्कम परतफेड करण्यासाठी आरोपीने १९ जून २०२१ रोजीचा धनादेश दिला. मात्र संबंधित धनादेश बँकेत सादर केल्यानंतर खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने तो अनादरित (बाऊन्स) झाला.
यानंतर फिर्यादीने कायद्यानुसार आरोपीला नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. मात्र आरोपीने निर्धारित मुदतीत ना नोटीसला उत्तर दिले, ना थकित रकमेचा भरणा केला. त्यामुळे फिर्यादीने न्यायालयात तक्रार दाखल केली.
सुनावणीदरम्यान फिर्यादीने धनादेश, बँकेचा मेमो, कायदेशीर नोटीस तसेच इतर आवश्यक कागदपत्रे न्यायालयात सादर केली. उपलब्ध पुरावे व साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपी आपल्या बचावासाठी कोणताही ठोस पुरावा सादर करू शकला नसल्याचे नमूद केले.
न्यायालयाने आरोपीस मूळ २ लाख २० हजार रक्कम, त्यावर ९९ हजार नुकसानभरपाई, तसेच खटल्याचा खर्च, स्टॅम्प शुल्क आणि वकिलांचे मानधन मिळून एकूण ३ लाख १९ हजार फिर्यादीस अदा करण्याचा आदेश दिला.
तसेच आदेशातील रक्कम एका महिन्याच्या आत न भरल्यास आरोपीला नऊ महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने अॅड. संदीप ढाकरे, सचिन ढाकरे, यांनी बाजू मांडली त्यांनी अॅड आकाश राऊत, प्रमोद पांडे, सतीश सुरडकर, स्नेहाली गवळी यांनी सहकार्य केले.














