विष्णूनगरात मेकॅनिकवर अ‍ॅसिड हल्ला

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जवाहरनगर कॉलनी परिसरातील विष्णूनगर येथे रविवारी (दि.८) सकाळी गॅरेजमध्ये काम करत असलेल्या मेकॅनिकवर अज्ञाताने अ‍ॅसिड फेकून जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात मेकॅनिकसह दुचाकीचे टायर बदलण्यासाठी आलेला ग्राहकही गंभीर जखमी झाला आहे. दोघांवरही घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, जवाहरनगर पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सिराज नजीर शेख (२६, रा. भारतनगर, गारखेडा) आणि वैभव अनिलराव पुजदेकर (२५, रा. शेंद्रा) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिराज हे नेहमीप्रमाणे गॅरेजवर काम करत होते. दरम्यान, वैभव पुजदेकर हे आपल्या दुचाकीचे (एमएच ४४ पी ५४८०) टायर बदलण्यासाठी आले असता, दबा धरून बसलेल्या अज्ञाताने त्यांच्या दिशेने अ‍ॅसिड फेकले. या हल्ल्यात सिराज यांच्या कपाळावर, गालावर, पाठीवर आणि पायावर अ‍ॅसिड पडल्याने ते गंभीर भाजले आहेत, तर वैभव यांच्याही हाता-तोंडावर अ‍ॅसिड उडाले आहे.