बीड बायपासवर दुसर्‍या दिवशीही कारवाई; सिडकोत रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात

Foto

औरंगाबाद: सिडको-हडकोतील प्रमुख रस्ते आणि चौकामध्ये भाजीपाला, फळ विक्रेते यांनी अतिक्रमण करुन दुकाने थाटली आहेत. या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळ निर्माण होतो. यासंबंधी नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर अखेर पोलिस आणि मनपा प्रशासनाच्या वतीने कारवाईला सुरुवात केली. तसेच बीड बायपासवर आज दुसर्‍या दिवशीही दुपारपर्यंत तीन अतिक्रमणे काढली. 

सिडको तसेच हडकोतील अनेक प्रमुख मार्गावर किरकोळ विक्रेत्यांनी टपर्‍या टाकुन व हातगाड्या लावून अतिक्रमणे केली आहेत. ही अतिक्रमणे रस्त्यावर केलेली आहेत. तेथे खरेदीसाठी ग्राहक ही वाहने थांबवतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. जळगाव रोडवरील भारतीय स्टेट बँकेच्यासमोर सिडको एन-5 मध्ये रस्त्यावरच फळ आणि विके्रत्यांनी दुकाने थाटली आहेत. या सर्व अतिक्रमणाचा फटका रस्त्यावर घर आणि दुकानांना बसत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी पोलिस आयुक्त आणि मनपा आयुक्तांना निवेदन दिले. त्यामुळे आज पोलिसांनी या सर्व दुकानदारांना सूचना दिल्या. मनपाकडूनही सूचना देऊन अतिक्रमणे हटविण्यात आली. यापूर्वीही अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. पण त्यानंतर पुन्हा या रस्त्यावर अतिक्रमण केले जाते. त्यामुळे मनपाने कायमस्वरुपी कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

बीड बायपासवर कारवाई 
बीड बायपासवर आज मनपा उपायुक्त रविंद्र निकम, इमारत निरीक्षक पी.बी. गवळी, सय्यद जमशेद, पी.डी. पाठक, सागर व कनिष्ठ अभियंता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणे काढण्यात आली. हॉटेल मदिनाच्या मालकने आपले दुमजली इमारत पाडण्यावर विरोध केला. एका महिलेने अंगावर रॉकेल घेऊन पेटवून घेण्याची धमकी दिली. पोलिसांनी तिला समजवून सांगितले. तसेच तिच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.