एक हायवा, जेसीबी जप्त; पोलीस पाटलांचे वाहन ताब्यात
गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील टेंभापुरी धरण परिसरातील लिंबे जळगाव येथील संपादित गट क्रमांक ७० मध्ये अवैधरीत्या माती उत्खनन सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान एक हायवा गाडी व एक जेसीबी माती उत्खनन करत असताना पकडण्यात आली.
सदर वाहनांवर कारवाई करून ती ताब्यात घेण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी वाहन पोलीस पाटील लिंबे जळगाव यांच्या ताब्यात देण्यात आली. तसेच पोलीस पाटील जिकठण यांच्या देखरेखीखाली ही वाहने ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मंडल अधिकारी सचिन भिंगारे, तलाठी संदीप पवार यांनी कारवाई केली.
गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी धरण परिसरात अवैध गौण खनिज उत्खननाच्या घटना वाढत असल्याने महसूल विभागाने कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित प्रकरणी पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.