राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग , पार्थ पवार अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला...

Foto
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री आणखी एक नवीन घडामोड घडताना दिसली. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोणालाही सुगावा लागू न देता पार्थ पवार हे शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले. याठिकाणी दोन्ही नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि भेटीचे नेमके प्रयोजन, याचा तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. 

 सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्ष संघटनेत कमालीचे सक्रिय झालेले पार्थ पवार हे काल एकटेच देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळल्याची बाब समोर आल्यानंतर या सगळ्या नाराजीनाट्याला सुरुवात झाली होती. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचे नाव निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत नसणे, ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आले होते. निवडणूक आयोगाला नव्या पदाधिकार्‍यांच्या यादीबाबत पत्र लवकरच पाठवले जाईल, असेही राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, ही खरोखरच प्रिंटिंग मिस्टेक होती की सुनेत्रा पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांना दिलेला अप्रत्यक्ष संदेश होता, याविषयी राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. 

पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काही नवीन घडामोडी घडणार का, हे बघावे लागेल. एकीकडे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षात साईडलाईन केल्याची चर्चा सुरु असताना सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी या सगळ्याबाबत चकार शब्द काढलेला नाही. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार हे जवळपास दररोज प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर शाब्दिक हल्ले चढवत आहेत. अजित पवार यांनी शेवटच्या चार महिन्यांमध्ये माझ्याशी बोलताना अनेकदा प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती, असा दावा रोहित पवार यांनी केला होता. याशिवाय, तटकरे आणि प्रफुल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील २२ आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा सनसनाटी आरोपही रोहित पवार यांनी केला होता. 

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी तिघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे माहिती नाही. परंतु, या बैठकीनंतर शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा अनुभव कसा मोठा आहे, हे सांगत एकप्रकारे त्यांचे कौतुक केले होते.  यानंतर दुसर्‍याच दिवशी सुनेत्रा पवार यांचे निकटवर्तीय असणारे प्रमोद हिंदुराव यांनी प्रफुल पटेल यांची भेट घेतली होती. मात्र, या सगळ्यानंतरही नाराजीनाट्याचा शेवट झाला नव्हता. अशातच आता पार्थ पवार यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.