औरंगाबाद: स्थानिक सत्तेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या महानगरपालिकेत विविध विभागात अधिकारी-कर्मचाऱ्यांची तोकडी संख्या असल्याने याचा थेट परिणाम कामावर जाणवतो. त्यातच भर म्हणजे गेली अनेक वर्ष मनपात सेवा बजावणारी ३५ जण या वर्षअखेरीपर्यंत सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे संबंधितांचा अतिरिक्त कामाचा बोजा इतर अधिकारी कर्मचाऱ्यांवर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक सत्तेचे केंद्र म्हणून परिचित असलेल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात असलेल्या तब्बल ११५ वार्डात विकासासंबंधीची विविध कामे केली जातात. आधीच शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मनपातील अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या तोडकी आहे. गेल्या अनेक वर्षापासून मनपात भरती प्रक्रिया झालेली नाही. (नुकतीच झालेली ९ अभियंत्यांची भरती वगळता) त्यामुळे विविध विभागात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून काम करून घेण्यात येत आहे. यातच गेली अनेक वर्ष मनपात सेवा बजावलेल्या अनेक अनुभवी अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत असून, यंदा २०१९ साली मनपातील तब्बल ३५ जण सेवानिवृत्त होत आहेत. यात विभागीय अधिकारी,शाखा अभियंता उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपीक, वाहन चालक, दुय्यम आवेक्षक,आरोग्य निरीक्षक, वार्ड अधिकारी, वाहन चालक आदींचा समावेश आहे. ३५ पैकी जुन अखेरीपर्यंत सुमारे २३ जन सेवानिवृत्त झालेले आहेत. तर उर्वरित १२ लोक डिसेंबर अखेरीपर्यंत सेवानिवृत्त होते आहे. त्या त्या विभागातील अनुभवी लोक सेवानिवृत्त होत असल्याने इतरांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडणार असल्याचे बोलले जात आहे.