प्रशासकीय यंत्रणाने केली पाहणी : अहवाल २ दिवसांत शासनाला सादर होणार

Foto
मराठवाड्यात पावसाची ३५ टक्क्यांची तूट
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) मराठवाड्यात यंदा पावसाने दगा दिल्यामुळे सरासरीच्या तुलनेत ३५ टक्क्‌यांची मोठी तूट नोंदवण्यात आली आहे. पावसाच्या खंडामुळे खरीप पिके धोक्यात आली असून, आगामी काळात तीव्र पाणीटंचाई आणि चारा टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेने पाहणी सुरू केली असून, दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर प्राथमिक अहवाल पुढील दोन दिवसांत शासनाला सादर केला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली.
विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,
यावर्षी अल निनोचा प्रभाव पर्जन्यमानावर झाला आहे. विभागात सरासरीच्या केवळ ६४.६ टक्के पाऊस झाला आहे. यावरून विभागात ३५ टक्के पावसाची तूट आहे. सर्वाधिक ५० टक्के तूट लातूर जिल्ह्यात आहे. त्यापाठोपाठ धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्ये ४० टक्के, परभणीत ४३ टक्के पावसाची तूट आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांत काही प्रमाणात पाऊस पडला असला, तरी तिथेही सुमारे २६ टक्के तूट कायम आहे.
धरणाचे पाणीसाठा आरक्षित
कमी पावसामुळे पाण्याचा टंचाईचा प्रश्न गंभीर रूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरणांमधील उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थिती पाहता सर्व यंत्रणा अलर्टवर आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी हे सर्वजण नियमित ग्रामीण भागांना भेटी देत आहेत. महसूल विभाग आणि कृषी विभागाचे अधिकारी बांधावर जाऊन पिकाची परिस्थिती, पाणीटंचाई, चारा टंचाई याबाबतचा अंदाज घेत आहेत. कृषी विभागाने तयार केलेल्या तक्त्यामध्ये माहिती भरून घेतली जात आहे. या सर्वांचा एकत्रित अहवाल तयार केला जाणार आहे. दुष्काळी स्थितीचा प्राथमिक अहवाल एक दोन दिवसांत शासनाकडे पाठविला जाणार असल्याचेही विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले.
मांजरा धरणात केवळ १० टक्के
मराठवाड्यातील ९१७ लहान-मोठ्या प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठ्याच्या तुलनेत ५० टक्के तूट आहे. जायकवाडी धरणात काही प्रमाणात साठा असला, तरी मांजरा धरणात अवघा १० टक्के पाणीसाठा उरल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. नद्यांमधील वाहते पाणी अडवण्यासाठी दरवर्षी सप्टेंबरमध्ये बंद केले जाणारे बंधारे यंदा जुलै-ऑगस्ट महिन्यातच बंद करण्यात आले आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions