अकरावी-बारावी प्रवेशाला वेग महाविद्यालयात लागले माहिती फलक

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी व बारावी प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून शहरातील तसेच ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची आणि पालकांची लगबग सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांचा ओढा कायम असला तरी यंदा वाणिज्य आणि कला शाखांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अनेक महाविद्यालयांनी विशेष मार्गदर्शन केंद्र सुरू केले असून अर्ज भरण्यापासून ते शाखा निवडीपर्यंत विद्यार्थ्यांना मदत केली जात आहे. महाविद्यालयात माहिती फलक देखील लावले गेले आहेत.
सध्या राज्यभर अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू आहे. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची माहिती तसेच महाविद्यालय निवडीबाबत विद्यार्थ्यांना अडचणी दूर करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने विशेष पावले उचलली आहेत. महाविद्यालयांच्या परिसरात विविध माहितीपर बॅनर, फलक आणि मार्गदर्शक सूचना लावण्यात आल्या आहेत. यामध्ये अर्ज कसा भरावा, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, प्रवेशाची अंतिम तारीख, आरक्षण प्रवर्गानुसार माहिती आणि गुणवत्ता यादीसंदर्भातील सूचना देण्यात येत आहेत. प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी अनेक महाविद्यालयांनी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांमार्फत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रक्रियेची माहिती देण्यावर भर दिला जात आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी लक्षात घेऊन विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांची पहिली पसंती मिळत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा कल प्रामुख्याने विज्ञान शाखेकडे असल्याचे दिसून येत आहे. सीए, सीएस, कॉस्ट अकाउंटंट, बँकिंग, वित्तीय व्यवस्थापन आणि व्यवसाय क्षेत्रातील संधी लक्षात घेता वाणिज्य शाखेलाही मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. गेल्या काही वर्षांत वाणिज्य शाखेचे आकर्षण वाढल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे महाविद्यालयीन प्रशासनाचे म्हणणे आहे. स्पर्धा परीक्षा, प्रशासन सेवा, पत्रकारिता, समाजकार्य, भाषा आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संधींमुळे कला शाखेकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसत आहे. कला शाखेतील विविध विषयांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यासाठी महाविद्यालयांकडून विशेष मार्गदर्शन केले जात आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions