मुंबईनंतर काँग्रेसचे पुण्यातही बिनसले ! स्वतंत्र लढण्याचाच विचार

Foto
पुणे : राज्यात महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसने या युतीवर नाराजी व्यक्त केली. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेसला उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षाबरोबर लढवायची होती, मनसेबरोबर जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती, असे विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी काल (२४ डिसेंबर) केले होते. आता त्यांनी पुणे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला इशारा दिला आहे.

पुणे महानगर पालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र लढवणार असल्याच्या चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचे विधान केले आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, ङ्गङ्घआम्ही ऐकलं आहे की पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. त्याबद्दल शरद पवार यांच्याबरोबर आमचं बोलणं सुरू होतं. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आम्हाला पर्याय नाही. आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू.फफ दरम्यान, मुंबईनंतर आता पुण्यातही महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये निवडणूक लढवण्याबाबत एकमत नसल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना (ठाकरे) व मनसे युतीवर विजय वडेट्टीवार काय म्हणाले ?

मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू आहे, मुंबईवर गुजरातचे नियंत्रण आता दिसू लागले आहे. त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी लढावे लागणार. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर निवडणूक लढण्याची होती, मनसेबाबत मात्र जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार हे माहीत होते. त्यांची चर्चा ही सुरू होती. इतर पक्षांप्रमाणे त्यांनाही शुभेच्छा देते. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून लढावं. आम्ही स्वबळाचा नारा दिला आहे. आमच्यासाठी विचारधारा महत्त्वाची आहे असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. समाज जोडणारे आम्ही आहोत, त्यामुळे समाज तोडणार्‍यांसोबत जाणार नाही, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. कॉफी विथ कौशिक या एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात वर्षा गायकवाड यांनी हे विधान केले आहे.

ठाकरे बंधूंनी आम्हाला विचारात न घेता युती केली, युती करताना आमच्यासोबत त्यांनी कोणतीही चर्चा केली नसल्याचा दावा काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केला. समाजातील दरी दूर झाली पाहिजे म्हणून आम्ही जोडणारे आहोत, त्यामुळे आम्ही तोडणार्‍यांच्या सोबत जाऊ शकत नाही असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.