धक्कादायक : नीटनंतर आता टीईटीचाही पेपर फुटला; उद्याची परीक्षा रद्द महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं ग्रहण, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

Foto
मुंबई : देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षाचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यात टीईटी परीक्षेचा पेपर लीक झाल्याचे उघडकीस आले आहे, त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून उद्या (२८ जून) होणारी ही परीक्षा तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. या परीक्षेला यंदा ४ लाख २८ हजार १२२ परीक्षार्थी बसले होते. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक ४५ हजार ५६२ परीक्षार्थी आहेत.

दरम्यान राज्यभरातून लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावलीही जाहीर केली होती. मात्र, ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि कार्यरत शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

पुढील परीक्षा कधी?
राज्यभरातून लाखो उमेदवारांनी या परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावलीही जाहीर केली होती. मात्र, ऐन परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि कार्यरत शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्यामुळे आता ही परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार? याकडे सर्व उमेदवारांचे आणि शैक्षणिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अद्याप नवीन तारीख जाहीर झालेली नाही. महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, परीक्षा पारदर्शक वातावरणात कधी होणार, असा संतप्त सवाल परीक्षार्थी विचारत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीमुळे देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातही अशाच प्रकारची घटना समोर आल्याने परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पेपरफुटीमागील नेमके कारण आणि जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्याचे काम संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. नव्या परीक्षेच्या तारखेबाबत अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे.

पेपरफुटीत सरकारचा सहभाग  दानवे
या पेपरफुटीवर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले की, या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही. नीट पेपरफुटीचं केंद्र महाराष्ट्रात आहे, हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं, हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं. कुठे गुड गव्हर्नन्स आहे, कुठे झिरो टॉलरन्स आहे? एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो. याचाच अर्थ सरकारचा पेपरफुटीमध्ये कुठेतरी सहभाग आहे. जे शिक्षक भावी पिढी घडवणार आहेत, त्या शिक्षकांची पात्रता परीक्षेचा पेपर फुटतो, याचा अर्थ आपण कुठे चाललोय हे पाहण्याची आवश्यकता आहे. हे कमकुवत सरकार आहे, भ्रष्टाचारी सरकार आहे. म्हणून या सर्व गोष्टी होत आहेत. या छोट्या परीक्षेचा पेपर सरकार सांभाळू शकत नाही, याचाच अर्थ हे सरकार भगवान भरोसे चालू आहे.