मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर टीका करताना आमदार गोपीचंद पडळकरांनी वाद ओढवून घेतला. 'तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही, काहीतरी गडबड असणार आहे', पडळकर म्हणाले. या विधानावर संताप व्यक्त होत असून, शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॉल करून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी गोपीचंद पडळकर यांचे कॉल करून कान टोचले.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "गोपीचंद पडळकरांनी जे विधान केलं, ते योग्य आहे असं माझं मत नाही. कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल विधान करणं हे योग्य नाहीये. यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे. त्यांनाही मी सांगितलं आहे."
"मला शरद पवारांचा फोन आलेला..."
पडळकरांनी जयंत पाटील आणि त्यांच्या वडिलांबद्दल केलेल्या विधानासंदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कॉल केला होता. यालाही फडणवीसांनी दुजोरा दिला. ते म्हणाले, "मला शरद पवारांचा फोन आला होता. तेही माझ्याशी यासंदर्भात बोलले. मी त्यांनाही सांगितलं की, अशा प्रकारची जी विधाने आहेत, त्याचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही."
फडणवीसांनी पडळकरांना काय सांगितले?
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत. अतिशय आक्रमक नेते आहेत आणि अनेकवेळा आक्रमकपणा दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल, हे ते लक्षात घेत नाहीत. म्हणून मी त्यांना हे सांगितलं आहे की, हे लक्षात ठेवून तुम्ही आक्रमकपणा ठेवला पाहिजे." "तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. त्यांच्यामुळे आपण बोलत असताना त्याचे कार्य अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे, असाही सल्ला मी त्यांना दिला", अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले ?
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका करताना पातळी सोडली. राजाराम पाटील, जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत पडळकर म्हणाले, "अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे, कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी मी औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे?", असे विधान पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल केले.