धार्मिक सहानुभूतीसाठीच खैरेंचा पुडी बॉम्ब ; विकासाचा 'कचरा'...सहनशीलतेला विसरा...

Foto
सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शांतिगिरी महाराजांना पराभूत केल्यानंतर ' एकच बाबा खैरे बाबा' अशा घोषणा शिवसैनिकांनी दिल्या होत्या. शांतिगिरी महाराजांना हरविल्यानंतर अध्यात्मिक क्षेत्रातही आपणच टॉप असल्याचा गवगवा खैरेंनी केला होता. त्यामुळे आताचा पुडी बॉम्ब म्हणजे खैरे बाबा पार्ट 2 च आहे.

खैरेंचे अध्यात्मिक कार्य सर्वश्रुत आहे. जिल्ह्यातील महत्वाचे धार्मिक कार्यक्रम, गावागावात होणारे भंडारे, हरिनाम सप्ताह आणि मंदिर उभारणीत खैरेंचा पुढाकार असतो. गेल्या पंचवीस वर्षांच्या राजकीय प्रवासात खरेंचे देवभोळेपण मतदारांच्या मनावर राज्य करून गेले आहे. त्यामुळे धार्मिक सहानुभूती मिळवण्याचा खटाटोप प्रत्येक निवडणुकीपूर्वी खैरे करतात यात शंका नाही. आरोग्य विभागाच्या कार्यक्रमात जिथे तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती त्याच व्यासपीठावर  खैरेंनी पुडी बॉम्ब टाकला. या पुडी परिणाम काय होईल याची खैरेंना कल्पना होतीच... अन घडलेही तसेच ! खैरेंच्या पुडी बॉम्ब वर मीडियातून प्रचंड टीका होऊ लागली. अगदी देशपातळीवरील मीडियाने पुडी वाले बाबा म्हणुन त्यांची चांगलीच धुलाई केली. यामुळे खैरे नाराज होतील अथवा खैरेंना राजकीय फटका बसेल असे म्हणणे चुकीचे ठरेल.  मतदार अशा वक्तव्यांना गांभीर्याने घेत नसतो उलट धार्मिकतेचा पगडा असलेल्यांना राजकारण्यांची अशी वक्तव्ये सुखावतात. विज्ञानवादी टीका करतात तर अनेक जण दुर्लक्ष करतात.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास केला तर इथे सुखावणारांची संख्या अधिक आहे. तसाही भारतीय समाज धर्मभोळा आहे. सतत सुरू असलेले व्रत-वैकल्य धार्मिक कार्यक्रम यामुळे समाजमन काहीसे हळवे असते. आरोग्य विभाग जिथे पोहोचला नाही तिथे बाबा बुवा आणि महाराजांचा वावर असतो. आरोग्यविज्ञान थांबले की दैवयोगाचा प्रवास सुरू होतो,  हे समाज मनावर बिंबलेले आहेच. त्यामुळेच अगदी चित्रपट मालिका आणि कथांमध्येही डॉक्टरांचे अथवा चित्रपटातील हिरोचे प्रयत्न तोडके पडले की देवाचा धावा करण्याचा प्रघात आहे. त्याचाच एक पार्ट म्हणजे हे देवभोळेपण. अगदी नेमक्या वेळी खैरेंनी धार्मिक संवेदनशीलता जागवून सोडली. अशा कुंकू आणि रक्षाच्या पुड्या देणाऱ्या महाराजांची आपल्याकडे कमी नाही. आणि या पुड्या खिशात बाळगणार्‍यांची संख्या ही नोंद घेण्यात एवढी आहे. राजकीय खेळीत पारंगत असलेल्या खैरनार आत्ताच अशी पुडी सोडावी का वाटली, याचाही विचार करावा लागेल.

खैरे बाबांसमोर आव्हानाचे डोंगर... 

 शहराच्या कचऱ्याचा आणि पाणीप्रश्नाचा गुंता बाबांना सोडवता आला नाही. ग्रामीण भागात विकासाची पुरती वाट लागली आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात असूनही या पक्षाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मराठा क्रांती मोर्चा ने बाबांना विरोध केल्याने त्यांची चांगलीच गोची झाली. दुसरीकडे भाजपमधील अनेक मोठे नेते खैरेंना धडा शिकविण्याच्या तयारीत आहेत. या सर्व बाबीं खैरेंना माहित नसतील असे नाही, मात्र राजकीय चाणाक्षपणा आणि निवडणूक कौशल्यात निपुण असलेल्या खैरेंना धार्मिकतेच्या आधारावर निवडणूक व्हावी, असे वाटते. त्यामुळे खैरेंचा पुडी बॉम्ब म्हणजे ठरवून टाकलेले अस्त्र आहे यात शंका नाही.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker