सांजवार्ता ऑनलाईन Apr 15, 2019
औरंगाबाद: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सायंकाळी 6 वाजता गारखेडा परिसरातील गजानन महाराज चौकात प्रचार सभा होत आहे. नाराज शहरवासीय मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे पाठ तर फिरवणार नाही ना, या भीतीने सेना नेत्यांना ग्रासले असून, सभेसाठी ग्रामीण भागातून अधिकाधिक लोकांना आणण्याची तयारी युतीने केली आहे. लोकांना आणण्यासाठी गाड्यांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रचार सभेची जय्यत तयारी भाजप-सेनेने केली असून, या सभेनंतर दुसर्या जिल्ह्यात गेलेली भाजपची नेतेमंडळी शहर व जिल्ह्यात सक्रिय होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
खासदार खैरे व शिवसेनेचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी काँग्रेस, एमआयएम तसेच शिवस्वराज्य बहुजन पक्षाने चांगलाच जोर लावला आहे. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात खैरे काहीसे बॅकफूटवर पडल्याचे दिसते. भाजप-शिवसेनेची युती झाली असली तरी जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांची मने मात्र अद्याप जुळली नाहीत. याचा फटका खैरेंना बसेल, असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आजची सभा महत्त्वपूर्ण ठरणार असे दिसते. नाराज भाजपच्या मंडळींना तसेच इतर जिल्ह्यात प्रचाराला गेलेल्या भाजपच्या नेत्यांना मुख्यमंत्री काय कानमंत्र देतात, याकडे शिवसेना बारीक लक्ष ठेवून आहे. खैरे यांना विरोधी पक्षांकडून मिळालेले आव्हान लक्षात घेता भाजपची टीम अधिक सक्रिय करण्याशिवाय पर्याय नसल्याचे बोलले जाते. स्वतः खैरेच आता मुख्यमंत्र्यांना याबाबत साकडे घालणार असल्याचे समजते.