लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा गंभीर अभ्यास तर भाजपात मात्र संभ्रमावस्था !

Foto
औरंगाबाद : लोकसभा निवडणूक जिल्ह्यातील राजकीय गणिते बिघडवणारी ठरली. नवख्या वंचित आघाडीने भल्याभल्या राजकीय पार्ट्यांना चकित करीत यश मिळविले. या यशाचे गमक शोधण्यात एमआयएम गर्क असले तरी भाजपा सेनेत मात्र प्रचंड अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा अजूनही कमी व्हायला तयार नाही. दुसरीकडे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह सेनेचे सर्व पदाधिकारी अत्यंत गंभीरपणे पराभवाची कारणमीमांसा करीत असताना भाजपात मात्र मुळीच आलबेल नाही. सेनेसोबत अन सेनेविरोधात असे दोन गट भाजपात पडले आहेत. 

लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या दोन महिन्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षात घडलेल्या घडामोडी पाहता सर्वाधिक कार्यक्रम शिवसेनेचेच झाले. शहरातील पदाधिकाऱ्यांचे मिळावे, बूथनिहाय बैठका, वार्ड निहाय मेळावे यासह तालुका पातळीवरही मेळावे घेण्यात आले आहेत. माजी खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी अत्यंत नियोजनबद्ध तयारी सुरू केल्याचे दिसते. सेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची नाराजी दूर करण्याबरोबरच नव्या कार्यकर्त्यांना पक्षात आणण्याचे मोठे काम सेना करीत आहे. खुलताबाद, गंगापूर, वैजापूर यासह इतर विधानसभा मतदारसंघात सेनेने अत्यंत नियोजनबद्ध काम सुरू केले आहे. पक्षांतर्गत मतभेद मिटवून एक दिलाने काम करण्याचे धोरण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याचे बोलले जाते. दुसरीकडे भाजपात मात्र गोंधळ उडाला आहे. सेनेसोबत अन सेने विरुद्ध अशा दोन टोकाच्या विचारधारा असलेले गट आमने सामने आले आहेत. त्याचे पडसाद शहरासह ग्रामीण भागातही उमटताना दिसतात. लोकसभा निवडणुकीत सेनेचे काम न केलेल्या भाजप नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांच्यावर काही भाजप नेते नाराज आहेत.  त्यामुळेच भाजपामध्ये संभ्रमावस्था कायम असल्याचे दिसते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा गट सेनेपासून अजूनही अंतर राखून आहे तर राज्यमंत्री अतुल सावे यांचे पदाधिकारी कार्यकर्ते सेनेशी जवळीक साधून आहेत. भाजपातील ही संभ्रमावस्था विधानसभेपर्यंत तरी दूर होणार नाही,असे दिसते. त्यामुळेच शिवसेनेने ज्याप्रमाणे एक दिलाने काम सुरु केले तसे काम अजूनही भाजपात सुरू झालेले नाही.

खैरे झालेत अपडेट 
लोकसभेच्या पराभवानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मंथन केले. आपल्याकडून चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करावे, असे अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांनाही खैरे म्हणाले. कार्यकर्त्यांच्या बैठका, पदाधिकाऱ्यांचे मेळावे पक्षाचे कार्यक्रम यासाठी खैरे आता तासभर आधीच पोहोचत आहेत. खुलताबादच्या कार्यक्रमाला उशिरा गेलेले खैरे गंगापूरच्या कार्यक्रमाला तासभर आधीच पोहोचले. एकंदरीत सेनेत मोठा बदल झाला असला तरी मित्रपक्ष भाजपात अजूनही ताळमेळ नाही एवढे मात्र खरे !