ठाकरे बंधूंच्या नंतर आता पवार काका-पुतणेही एकत्र येणार? अजित पवारांचे सूचक विधान

Foto
मुंबई : महाराष्ट्रात सध्या राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या पुन्हा एकत्र येण्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. २९ महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही भावांनी २० वर्षांनंतर पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला. आता त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर वेगळे झालेले शरद पवार व अजित पवार हे काका-पुतणेदेखील पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं युती केल्याचं समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना आधीच उधाण आलं होतं. त्यात आता अजित पवारांनी एका मुलाखतीदरम्यान केलेल्या सूचक विधानामुळे त्यात आणखी भर पडली आहे.

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी राज्यातील अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यावेळी पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी झालेली युती, भविष्यात दोन्ही पवार एकत्र येण्याची शक्यता आणि शरद पवारांकडून नेतेमंडळींचा प्रचार यावर भाष्य केलं. पुण्यात आधी दोन्ही राष्ट्रवादीची युतीची चर्चा फिसकटली होती, पण नंतर पुन्हा चर्चा झाली व युतीची घोषणा झाली. या घडामोडींसंदर्भात अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्यावर भाष्य केलं.

माझी सर्वाधिक चर्चा डॉ. अमोल कोल्हे, रोहित पवार, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे यांच्याशी झाली. ते कदाचित त्यांच्या वरिष्ठांशी किंवा कोअर टीमशी चर्चा करत असतील. आधी थोडं जागांवर पुढे-मागे झालं. ज्या जागा तुतारीला हव्या होत्या, त्याच जागा घड्याळाला हव्या होत्या वगैरे. शेवटी तुम्ही कुणाबरोबर आघाडी-युती करता तेव्हा दोन पावलं पुढे-मागे सरकावं लागतं. आधी अपयश आलं, पण नंतर पुन्हा प्रयत्न केला. तेव्हा थोडंफार यश आलं, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रचाराकडे पाठ?

दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणीही मोठे नेते पुणे वा पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचारात दिसत नसल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं होतं. त्यासंदर्भात विचारणा केली असता अजित पवारांनी सविस्तर भाष्य केलं. ङ्गङ्घमाझ्या माहितीप्रमाणे जितेंद्र आव्हाडांचं काम ठाण्यात चालू आहे. अमोल कोल्हे, निलेश लंके असे काही मान्यवर प्रचारासाठी येणार आहेत. सुप्रिया सुळेंनी त्यांच्याही कार्यकर्त्यांना सांगितलं की त्याही वेळ देणार आहेत, असं ते म्हणाले.

खरंच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का?

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात भाष्य केलं. निवडणुका झाल्यानंतर यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यताच त्यांनी अप्रत्यक्षपणे व्यक्त केली. अजून तो विचार आम्ही केलेला नाही. सध्या निवडणुकीची खूप धामधूम आहे. आम्हाला रोज निवडणुकीचं मोठं काम करावं लागतंय. आधी उमेदवार निवड, मग छाननी, मग काहींची अर्ज माघारी वगैरे गोष्टी घडल्या. त्यामुळे त्याबाबतीत आम्ही सध्या विचार केलेला नाही. पण साधारण खालचे कार्यकर्ते समाधानी आहेत एवढं मात्र पाहायला मिळालं आहे. राजकीय जीवनात काम करत असताना माझं एवढंच सांगणं आहे की राजकारणात कुणी कुणाचं कायम शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायम मित्र नसतं. यावरून काय ओळखायचं ते ओळखा, असं ते म्हणाले.