मुंबई: शिवसेना (ठाकरे गट) ६ खासदारांच्या फुटीच्या धक्क्यातून सावरत नाही तोच, आता पक्षाला आणखी एक मोठा सुरुंग लावण्याची तयारी सुरू झाली आहे. ऑपरेशन टायगर-२ च्या यशानंतर आता ऑपरेशन टायगर-३ यशस्वी करण्यासाठी ठाण्यातून अत्यंत गोपनीय पद्धतीने हालचाली सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. या नव्या मोहिमेअंतर्गत ठाकरे गटाचे तब्बल १४ आमदार फोडण्याची रणनीती आखली जात आहे.
कायदेशीर कचाट्यातून वाचवण्यासाठी कागदपत्रांची तयारी
पक्षांतर केल्यानंतर या १४ आमदारांवर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये किंवा ते अपात्र ठरू नयेत, यासाठी कायदेतज्ज्ञांच्या मदतीने आवश्यक ती सर्व कागदपत्रे आधीच तयार केली जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, फुटीनंतर या आमदारांना थेट सुरक्षित आणि अज्ञात स्थळी हलवण्यात येणार असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. या आमदारांची राहण्याची, खाण्यापिण्याची आणि सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील अत्यंत विश्वासू शिलेदारांवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे आमदार फुटल्यानंतर नॉट रिचेबल होण्याची शक्यता आहे.
ठाकरे सभांमध्ये व्यस्त, तिकडे आमदारांची मोट बांधणे सुरू
विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ६ खासदार फोडून एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. सध्या उद्धव ठाकरे हे शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे या सभांमध्ये व्यस्त असतानाच, मुंबईत त्यांच्या उरलेल्या आमदारांचा एक मोठा गट पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात ठाकरे गटाच्या काही आमदारांनी गुपचूप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच ऑपरेशन टायगर-३ ला प्रचंड वेग आला आहे. या संपूर्ण मोहिमेचा निर्णायक टप्पा ८ जुलैच्या आसपास पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे ऑपरेशन जर यशस्वी झाले, तर राज्यातील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलतील आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा सध्या ठाण्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.















