महायुती तीन जागा हरल्यानंतर महातुतीत तू तू मै मै !! भाजप पहिल्यांदाच आक्रमक, शिंदेंविरोधात थेट हल्ला, भाजपचा संयम सुटला !!

Foto
मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये काँग्रसेच्या अभिजीत वंजारी यांचा झालेला विजय, पुणे पदवीधरमध्ये अगदी शेवटच्या क्षणी पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी दिलेल्या स्मिता जाधव यांना पाहावे लागलेले पराभवाचे तोंड तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे चौकार मारण्याच्या तयारीत असलेले सतीश चव्हाण यांनाही पराभवाचा धक्का बसल्याने सत्ताधारी महायुती बॅकफूटला गेली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला विजय आपलाच असे ठासून सांगणारी महायुती बुधवारी संध्याकाळी आत्मचिंतनाच्या मोडमध्ये गेली. यावरुन  सत्ताधारी भाजप-शिवसेनेत तू तू मैं मैं सुरू झाली असून भाजपने थेटपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरले आहे. तर महायुतीच्या वादात, शिवसेनेने लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला, भाजपने एकनाथ शिंदेंना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे अशी थेट मागणी रवींद्र धंगेकरांची यांनी केली आहे.
 
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला. त्यांना मिळालेली मतं पदवीधर निवडणुकीत भाजपला मिळाली नाहीत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसलाच्या विरोधात प्रचार केला. त्याचाही फटका बसला.

शिवसेनेने महायुतीचा धर्म पाळून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केले असते, तर पाचही जागांवर महायुतीचा विजय झाला असता. मात्र, पुण्यातील एका जागेच्या हव्यासापोटी शिवसेनेने मित्रपक्षांना अडचणीत आणले आणि तीन जागांवरील विजयाची संधी गमावली. एका जागेसाठी मित्रपक्षांचे नुकसान करण्याची भूमिका महायुतीच्या हिताची नाही, अशा शब्दात भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी आपली नाराजी व्यक्त करताना पराभवाचे खापर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर फोडले.

पाचही जागा जिंकण्याची सहज शक्यता असताना दोन वर का थांबलो?
दुसरीकडे, पाच जागांच्या निकालानंतर तरी महायुती म्हणून आत्मचिंतन करणार आहोत का? एकत्रित लढलो असतो तर पाचही जागा जिंकण्याची सहज शक्यता असताना दोन वर का थांबलो याचा विचार करणार आहोत का? अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

भाजपच्या टीकेवर रविंद्र धंगेकर यांचा पलटवार
 शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीत लपून पाठिंबा दिला नाही, ओपन पाठिंबा दिला आहे. तुम्ही मैत्रीला, समन्वय शोधायला कमी पडत आहेत का? ही सगळी चर्चा आहे, ही चर्चा बन यांची नाही. एकनाथ शिंदे यांना पुन्हा नेतृत्व दिले पाहिजे, अशी मोठी मागणी शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. जयंत पाटलांनी मला फोन केला होता त्यांनी अभिनंदन केलं, सगळे आपले मित्र आहेत, असेही धंगेकर यांनी म्हटलं आहे.
लोकशाहीत निकाल लागल्यानंतर जनतेचा कौल मान्य करावा लागतो, अशा शब्दात रविंद्र धंगेकर यांनी भाजपचा हल्ला परतवून लावला आहे. तसेच मतदारांमध्ये सरकारविषयी नाराजी दिसते. सरकारच्या कामकाजाबाबत जेव्हा संशय उपस्थित होतो, तेव्हा अशा गोष्टी घडतात. त्यामुळे भाजपने शिवसेनेवर खापर फोडणं चुकीचं आहे, असे सांगत नेतृत्वाची जबाबदारी पुन्हा शिंदेंकडे दिली पाहिजे, असे मोठे वक्तव्य रविंद्र धंगेकर यांनी केले.