नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने राबवलेली एसआयआर प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सध्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेससह विरोधी पक्षांची इंडिया आघाडी कमालीची आक्रमक झाली आहे. तसेच आपल्या मागण्यासांठी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीकडून आज थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीशांना निवेदन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालायात भेटण्यास येणार्या विरोधकांना भेटण्यास सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी असमर्थता दर्शवली आहे. तसेच थेट प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली आहे.
राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नियोजित मोर्चामुळे दिल्लीतील वातावरण तापलं असताना माध्यमांसमोर आलेले सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सांगितले की, त्यांचं पत्र मला काल मिळालं आहे. तसेच त्याला मी उत्तरही दिलं आहे. तसेच शिष्टमंडळ घेऊन भेटायला येणार्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटण्याबाबत मी असमर्थता व्यक्त केली आहे.तसेच त्यामागची काही कारणंही मी सांगितली आहेत, असे सरन्यायाधीश म्हणाले.
सरन्यायाधीशांनी पुढे सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. कुणीही नागरिक असो वा कुठल्या लोकनियुक्त संस्थेतील सदस्य असो, तो याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकतो. आमच्याकडे येण्याचा भारतातील प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आम्ही कायदेशीर व्यवस्था आणि कायद्यानुसार त्याची जी समस्या असेल त्यावर आम्ही सुनानणी घेऊ. तसेच त्यांना त्यांचा योग्य तो अधिकार देऊ.यावेळी दिल्लीत सातत्याने होत असलेल्या आंदोलनांबाबत विचारले असताहा कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय आहे. तो माझा विषय नाही, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.