छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): कृषी उत्पन्न बाजार समिती कर (सेस) रद्द करावा या मागणीसाठी आज महाराष्ट्रभर आडत बाजारपेठ आज ठप्प झाला आहे. शहरातही स्थानिक आडत बाजारपेठ आज सकाळपासून पूर्णपणे ठप्प झाली असून शेतकरी वर्ग तसेच बाहेरून येणारे धान्य आज आले नाही. या बंद पडलेल्या व्यवहारांमुळे बाजारात रोजची होणारी लाखोंची उलाढाल थांबली आहे.
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज बाजारपेठ बंद ठेवून आडत व्यापार्यांनी बंद पुकारण्यात आला. मागण्या मान्य व्हाव्यात आडत व्यापार्यांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करावे. या मागणीसाठी आज आडत व्यापार्यांनी बंद पुकारला आहे. असे दि औरंगाबाद मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष हरिष पवार यांनी स्पष्ट केले. आजच्या या आडत व्यापारी बंदला विविध व्यापारी संघटनेच्या वतीने देखील पाठींबा दर्शविला आहे. महाराष्ट्रातील आडत व्यापारी बंदला महाराष्ट्र चेंबर ऑफ़ कॉमर्स इण्डस्ट्री - एग्रीकल्चर - मुंबईचा पाठींबा दिला आहे. असे चेंबरचे उपाध्यक्ष प्रफुल मालानी यानी सांगीतले.
शंभर टक्के बंद
आडत व्यापार्यांनी आज बाजारपेठ बंद ठेवून विविधमागण्या मांडल्या. महाराष्ट्रभरातील सात ते आठ लाख आडत व्यापार्यांनी यात सहभाग नोंदविला. तर जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक आडत व्यापार्यांनी यात सहभाग नोंदवला. यामुळे आज भाजीपाला आला नाही. प्रतिदिन शंभर गाड्या भाजीपाला मार्केटमध्ये येतो तर तीनशे ते चारशे गाड्या धान्य बाजारात येते. आज ते आले नाहीत.
काय आहे मागण्या
अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर ५% जीएसटी लागू झालेला आहे व त्याचे राजस्व राज्यशासनाला मिळत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कर (सेस) रद्द करावा. राष्ट्रीय बाजार समिती बाबत शासनाने प्रस्तावित केलेल्या अध्यादेशामधील त्रुटी दूर करण्याबाबत कृती समितीबरोबर त्वरीत चर्चा करण्यात यावी.
कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कायद्यांमधील बदलांबाबत कृती समितीतर्फे यापूर्वी सुचविण्यात आलेल्या बदलांबाबत कृती समिती बरोबर चर्चा करुन निर्णय घ्यावेत. याशिवाय अन्न सुरक्षा व मानदे कायद्यामधील जाचक तरतुदी रद्द कराव्यात. अनुचित कारवाईस प्रतिबंध करावा. तसेच यापूर्वी दिलेल्या आश्वसनानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवाने ऑनलाईन उपलब्ध करुन द्यावेत. अन्यथा महाराष्ट्रातील व्यापारी परवाने नुतनीकरण करणार नाहीत. अशा मागण्यांसाठी आज आडत व्यापार्यांनी सहभाग नोंदवला.