वैजापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील धोंदलगाव येथे खरीप हंगाम पूर्वतयारी आणि पिकांचे नुकसान करणाऱ्या हुमणी अळीच्या समूळ उच्चाटनासाठी कृषी विभागाच्या वतीने विशेष हुमणी अळी नियंत्रण मोहीम युद्धपातळीवर राबवली.
या मोहिमेअंतर्गत कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत गावात ठाण मांडून प्रत्यक्ष शेतावर जाऊन मार्गदर्शन केले. सर्वांची साथ, हह्मणी होई भुईसपाट या घोषणेचा नारा देत संपूर्ण गाव या मोहिमेत सहभागी झाले होते.
या मोहिमेला उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, तालुका कृषी अधिकारी व्यंकटजी ठक्के, मंडळ कृषी अधिकारी मोहनीराज मोरे, उप कृषी अधिकारी किरण भुजबळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
गावपातळीवर या मोहिमेचे नियोजन धोंदलगावचे सहाय्यक कृषि अधिकारी दिपक कुचेकर यांनी केले होते. १५ प्रकाश सापळ्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. हुमणी अळीचे भुंगेरे पहिल्या पावसानंतर रात्रीच्या वेळी कडुनिंब आणि बाभळीच्या झाडांवर गोळा होतात. कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाने रात्री अंधारात गावातील वेगवेगळ्या १५ लाईट ट्रॅप (प्रकाश सापळे) लावलेल्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. यावेळी प्रकाश सापळ्यांभोवती जमा झालेले हुमणीचे भुंगेरे गोळा करून ते नष्ट करण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवण्यात आले.
गावातील भाग्यलक्ष्मी महिला शेतकरी गटाच्या महिला शेतकऱ्यांनी कापूस पिकाची लाईव्ह शेतीशाळा जॉईन केली होती. या शेतीशाळेत महिला शेतकऱ्यांना कापूस पिकावरील कीड नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि हुमणी मणी अळीपासून कापसाच्या पिकाचे रक्षण कसे करावे, याचे डिजिटल व प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
महिला शेतकऱ्यांचा हा सक्रीय सहभाग कौतुकास्पद ठरला. यावेळी शेतकऱ्यांना रासायनिक औषधांचा अतिवापर टाळून मेटारायझियम अॅनिसोपली या जैविक बुरशीचा वापर करण्याचे आवाहन केले. या रात्रीच्या विशेष मोहिमेमुळे थोंदलगावच्या शेतकरी बंधू आणि महिला शेतकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला.














