कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केली गंगापूर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी

Foto
कन्नड, (प्रतिनिधी): राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील चाराटंचाई लक्षात घेऊन पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आतापासूनच उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या शेतीवर चारा निर्मितीवर भर देण्याची सूचना राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी केली. त्यांनी दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील जामगाव येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या प्रक्षेत्राला भेट दरम्यान दिली.

गंगापूर तालुक्यातील अंतापूर, जामगाव व भिवधनोरा येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळी परिस्थितीत
जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी चारा मुरघास (सायलेज), विविध पिकांचे भुसे व इतर पर्यायी चारा
स्त्रोत यांचा वापर, तसेच शेततळ्यांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा. आगामी काळातील पाणी नियोजन याबाबत सविस्तर चर्चा केली. बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून शेती व पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी नियोजन करण्यावर चर्चा करण्यात आली. 

यावेळी भिवधनोरा येथील पानी फाउंडेशनशी संबंधित कृषी कन्या महिला शेतकरी गटाने विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून केलेल्या सोयाबीन शेतीचीही कृषी आयुक्तांनी पाहणी केली. या दौऱ्यात विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, उपविभागीय कृषी अधिकारी वैजापूर आनंद गंजेवार, उपविभागीय अधिकारी अविनाश लोंढे, तहसीलदार नवनाथ वगवाड, तालुका कृषी अधिकारी बापूराव जायभाय, शेती महामंडळाचे अधिकारी मुनलोड तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.