महानगर पालिका निकाल २०१८: अहमदनगरमध्ये त्रिशंकू स्थिती, धुळ्यात भाजप एकतर्फी

Foto

अहमदनगर / धुळे – अहमदनगर आणि धुळे महापालिकेसाठी रविवारी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज (सोमवार) जाहीर होत आहे. अहमदनगमध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाली असून धुळ्यात भाजप एकतर्फी सत्ता मिळवताना दिसत आहे. येथे भाजपने ७० पैकी ३८ जागा जिंकल्या आहेत. नगरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी २५ जागांसह पुढे आहे. मात्र सत्तेचा सोपान चढण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशा जागा नाहीत. छिंदम प्रकरणानंतर येथे शिवसेना पुन्हा भाजपला साथ देणार का, हे पाहाणे औत्सूक्याचेे आहे. 

नगरमध्ये त्रिशंकू, शिवसेना-भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता

अहमदनगर महापालिकेसाठी रविवारी मतदान झाले. १७ प्रभागातील ६८ जागांसाठी रविवारी ६७ टक्के मतदान झाले. सोमवारी दुपारी १ वाजतापर्यंत आलेल्या निकालानुसार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला २५, भाजप १८ आणि शिवसेनेला १७ जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षांना ८ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना-भाजप येथे वेगवेगळे लढले असले तरी सत्तेसाठी या दोन्हीपक्षात युती होण्याची शक्यता आहे. बहुमतासाठीचा (३५) आकडा ते पूर्ण करत असल्यामुळे पक्षाचे आदेश आल्यानंतर सत्तेसाठी येथे युती होण्याची शक्यता अधिक आहे. दुसरीकडे, भाजपचे माजी नगरसेवक छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या अक्षेपार्ह्य विधानानंतरही शिवसेना भाजपसोबत जाणार का, हे पाहाणे महत्त्वाचेे आहेे. येथे शिवसेना जर आघाडीसोबत गेली तर राज्याच्या राजकारणात एका नवीन सत्ता समीकरणाचा पायंडा पडू शकतो. आगामी  विधानसभा निवडणुकीतही हेच समीकरण राहिल्यास भाजप वगळून सर्व पक्ष एकत्र येण्याची सुरुवात नगरमध्ये होऊ शकते. 

धुळ्यात गोटेंचा धुव्वा, भाजप विजयी

धुळे महापालिकेत आमदार अनिल गोटे यांनी उडी घेऊन येथील निवडणूक रंगतदार केली होती. मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर गोटेंनी प्रत्येक सभेतून हल्लाबोल केला होता. त्यांच्या या शाब्दिक हल्ल्याला भाजपनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. धुळ्यात अनिल गोटे काही चमत्कार करुन दाखवतील, असे बोलले जात होते, मात्र मतदारांनी त्यांना हवातसा प्रतिसाद दिला नाही. ७० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत गोटेंच्या लोकसंग्रामच्या वाट्याला धुळेकरांनी ३ जागा दिल्या आहेत. येथे भाजपला ३८ जागांवर यश मिळाले आहे तर शिवसेना ७ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी १८ जागांवर थांबली आहे. समाजवादी पार्टीला १ जागा मिळाली आहे, तर एआयएमआयएमने धुळ्यात ३ जागा जिंकल्या आहेत.