सीजेपीच्या तिरंगा यात्रेपूर्वी दिल्ली पोलिसांनी अभिजित दिपकेना त्यांच्या निवासस्थानीच घेरले !! दीपके यांनी व्यक्त केला संताप

Foto
नवी दिल्ली : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणातील कथित गैरव्यवहार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दिल्लीत मोठा राजकीय संघर्ष पेटला आहे. 'कॉकरोच जनता पार्टी'ने आज, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता नवी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये 'लहरा दो तिरंगा' अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनापूर्वीच राजधानीत प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके वास्तव्यास असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते अनिश गावंडे यांच्या झंडेवालान येथील बंगल्यावर दिल्ली पोलिसांचे पथक पोहोचले आहे. दिपके यांनी गुरुवारी रात्रीच पत्रकार परिषद घेऊन आपल्याला पोलीस बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली होती.

'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या कनॉट प्लेस येथील प्रस्तावित आंदोलनापूर्वी दिल्लीत राजकीय नाट्य शिगेला पोहोचले आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचे पथक दिपके थांबलेल्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना आंदोलन न करण्याबाबतची अधिकृत कायदेशीर नोटीस बजावली. या वेळी पोलिसांच्या भूमिकेवर अभिजित दिपके यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

पोलिसांशी संवाद साधताना दिपके म्हणाले, "आम्ही कुठेही मोर्चा काढणार किंवा निदर्शने करणार असे म्हटलेलेच नाही. आम्ही फक्त तिथे जाऊन तिरंगा फडकवणार असल्याचे सांगितले होते. देशात स्वतःचा राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन जाणे कायद्याच्या विरोधात आहे का?"

"इंग्रजांचे पोलीस आल्यासारखे वाटतेय" – अभिजित दिपके
पोलिसांनी नोटीस दिल्यानंतर माध्यमांशी आणि पोलिसांशी बोलताना दिपके यांनी सरकार आणि प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. "मला असे वाटत आहे जणू काही इंग्रजांचे पोलीस माझ्या घरी आले आहेत. लोकशाही मार्गाने बोलणाऱ्या तरुणांना, विद्यार्थ्यांना तुम्ही मारहाण करता, तर दुसरीकडे हातात लाठ्या-काठ्या घेऊन दहशत माजवणाऱ्या गुंडांना मात्र मोकळे सोडले जाते," असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

नोटीस बजावून रोखण्याचा प्रयत्न
कोणत्याही परिस्थितीत कनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी दिपके यांना आंदोलनात सहभागी न होण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली नगरपालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून सेंट्रल पार्क आधीच सामान्य नागरिकांसाठी बंद केले आहे. कनॉट प्लेस आणि आजूबाजूच्या परिसरात बीएनएसएसच्या कलम १६३ अंतर्गत जमावबंदीचे आदेश लागू असून, कोणत्याही प्रकारच्या रॅलीला किंवा एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रवक्ते अनिश गावंडे यांच्या झंडेवालान येथील बंगल्यावर दिल्ली पोलिसांचे पथक पोहोचले आहे. 

'आप'ची २०० फूट लांब तिरंग्यासह एंट्री; सौरभ भारद्वाज आक्रमक
दिल्लीत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत आम आदमी पक्षाचे नेते २०० फूट लांब तिरंगा हाती घेऊन रस्त्यावर उतरले. आप नेते सौरभ भारद्वाज यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. "स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटीश म्हणायचे की फक्त युनियन जॅक फडकवला जाईल, आणि स्वातंत्र्यसैनिक तिरंगा फडकवण्याचा निर्धार करायचे. आज देशात तिरंगा फडकवण्यावरच निर्बंध लादले जात आहेत. देशाचा तिरंगा फडकवणे कधीपासून गुन्हा ठरले? तिरंगा रोखण्यासाठी पोलीस छावणी उभी केली जात आहे."

मुंबईच्या आझाद मैदानात तिरंगा रॅलीला परवानगी
दिल्लीत रॅलीवर बंदी घालण्यात आली असली, तरी मुंबई पोलिसांनी सीजेपीला दक्षिण मुंबईतील आझाद मैदानात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शांततापूर्ण तिरंगा आंदोलन करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. पक्षाचे सहकारी आशुतोष रांका आणि सौरव दास यांना न्यायालयीन कोठडीत पाठवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

कनॉट प्लेस बनले पोलीस छावणी; २८ हजार जवान तैनात
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली प्रशासनाने कनॉट प्लेस आणि आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा कडक केली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिल्ली पोलिसांचे ६ हजार आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे २२ हजार असे एकूण २८ हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. परिसरात जमावबंदीचे आदेश म्हणजेच 'भारतीय नागरिक सुरक्षा संहिता' (BNSS) च्या कलम १६३ अंतर्गत निर्बंध लादण्यात आले आहेत. नवी दिल्ली नगरपालिकेने १६ आणि १७ ऑक्टोबर असे दोन दिवस कनॉट प्लेसचे सेंट्रल पार्क सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यापाऱ्यांचा तीव्र आक्षेप: "सणासुदीच्या काळात रोजीरोटी हिरावू नका"
नवी दिल्ली ट्रेडर्स असोसिएशनने कनॉट प्लेसमध्ये अशा राजकीय आंदोलनांना विरोध दर्शवला आहे. "कनॉट प्लेस हे एक प्रमुख व्यावसायिक आणि मार्केट केंद्र आहे, आंदोलनांची जागा नाही. आंदोलकांना आंदोलनाचा अधिकार असेल, तर आम्हालाही आमची उपजीविका चालवण्याचा घटनात्मक अधिकार आहे. सध्या दिवाळी आणि सणासुदीचा काळ सुरू असल्याने व्यवसायावर आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेवर परिणाम होईल. त्यामुळे आंदोलकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या इतर ठिकाणी जाऊन आंदोलन करावे," असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे.