१ जूनपासून विमान प्रवास बदलणार ! इंडिगो आणि एअर इंडियाने घेतला हा मोठा निर्णय...

Foto
नवी दिल्ली : वाढत्या एटीएफ किमती आणि कमी मागणीमुळे एअर इंडिया आणि इंडिगोने १ जून २०२६ पासून पुढील ९० दिवसांसाठी देशांतर्गत विमानसेवा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया आपल्या सेवा सुमारे १५ टक्क्यांनी, तर इंडिगो ५-७ टक्क्यांनी कमी करू शकते.

नवी दिल्ली :  भारतीय हवाई प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट आहे. देशातील दोन सर्वात मोठ्या विमान कंपन्या, एअर इंडिया आणि इंडिगो यांनी देशांतर्गत उड्डाणे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही विमान कंपन्या १ जून २०२६ पासून पुढील ९० दिवसांसाठी अनेक देशांतर्गत मार्गांवरील उड्डाणांची संख्या कमी करण्याची तयारी केली आहे. यामागे एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर प्रवासी मागणीत झालेली घट ही प्रमुख कारणे असल्याचे म्हटले जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडिया आपल्या देशांतर्गत उड्डाणांमध्ये अंदाजे १५% कपात करू शकते, तर इंडिगो ५% ते ७% उड्डाणे कमी करण्याची तयारी करत आहे. जगभरात  इंधनाच्या किमती वाढत आहेत आणि पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम विमान वाहतूक क्षेत्रावर होत आहे, या पार्श्वभूमीवर आता या कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. 

इंधनाचे दर वाढले
विमान वाहतूक उद्योगातील जाणकारांच्या मते, अनेक शहरांमध्ये एटीएफचे दर आता प्रति किलोलिटर १ लाख रुपयांपेक्षा जास्त झाले आहेत. पूर्वी हा दर सुमारे ८०,००० रुपये होता. वेगवेगळ्या राज्यांमधील व्हॅटच्या वेगवेगळ्या दरांमुळे विमान कंपन्यांवरील खर्चाचा दबाव आणखी वाढला आहे. यामुळेच आता कमी प्रवासी असलेल्या मार्गांवर उड्डाणे चालवणे विमान कंपन्यांना किफायतशीर वाटत नाही.
मुंबई आणि दिल्लीसारख्या प्रमुख विमानतळांवरून अनेक मार्गांवरील विमानसेवा कमी केली जाईल. मुंबईहून अहमदाबाद, नागपूर, पाटणा आणि भोपाळला जाणार्‍या विमानसेवांवर परिणाम होऊ शकतो. दिल्लीहून हैदराबाद, बंगळूर आणि कोलकाताला जाणार्‍या विमानसेवांमध्येही घट होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील काही मार्गांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

कोणताही मार्ग पूर्णपणे स्थगित केला जाणार नाही. कामकाज संतुलित ठेवण्यासाठी केवळ उड्डाणे कमी केली जातील. प्रवाशांना शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी, अनेक उड्डाणे बुकिंग वेबसाइटवरून आधीच काढून टाकण्यात आली आहेत.