छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या अकराव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली असून बुधवारी (दि. २८ जानेवारी ते रविवारी दि. १ फेब्रुवारी) हा महोत्सव आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे.
नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन आयोजित अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सुचना एवं प्रसारण मंत्रालय, भारत सरकार व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत आहे. एनएफडीसी व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, महाराष्ट्र शासन यांची सहप्रस्तुती असणार आहे. महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक व एक लक्ष रूपये देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचाही समावेश राहील. उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. २८) सायंकाळी ६ वाजता रूक्मिणी सभागृह, एमजीएम परीसरात होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. यंदाचा पद्मपाणि पुरस्कार प्रसिध्द व ज्येष्ठ संगीतकार पद्मविभूषण इलयाराजा (राज्यसभा सदस्य) यांना प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल व एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, दिग्दर्शक आशुतोष कुलकर्णी, ऑस्कर विजेते ध्वनी संयोजन रसूल पुक्कूट्टी, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, प्रोझोनचे सेंटर डायरेक्टर व वरिष्ठ उपाध्यक्ष कमल आर. सोनी उपस्थित राहणार आहेत.













