फुलंब्री, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाल येथे अजिनाथ नारायण भालेराव (वय ४०) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.११) दुपारी एकच्या सुमारास घडली.
या घटनेमुळे पाल गावात शोककळा पसरली आहे. अजिनाथ भालेराव यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अजिनाथ यांना तातडीने फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी बचत गटाकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीच्या तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या तपासानंतरच त्याबाबत स्पष्टता येईल.
या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस बीट अंमलदार अनिल शिंदे पुढील तपास करीत आहेत. अजिनाथ भालेराव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा मोठा परिवार आहे.















