पुणे : राज्यात २९ महापालिकांचा निवडणुका आहेत. कुठे युती आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या जात आहेत. तर कुठे स्वतंत्रपणे. राज्यात महायुतीचे सरकार असले तरी पुण्यात भाजप -राष्ट्रवादी अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमकी उडत आहेत. त्याचे कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ते भाजपाविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. विशेष म्हणजे आज चक्क दोन्ही राष्ट्रीवादी नेते एकत्र आल्याचे बघायला मिळत आहे.
नुकताच पुण्यात दोन्ही राष्ट्रीवादीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे उपस्थित होते. ही पुण्यामध्ये झालेली आघाडी ही राजकीय तरतूद आहे का? यावर सुप्रिया सुळे यांनी तुम्हाला जो अर्थ काढायचाय तो काढा असे उत्तर दिले तर ताई आणि दादांचा असाच प्रवास इथून पुढच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे का? या प्रश्नाच्या उत्तरावर अजित पवार म्हणाले, थांबा आणि पाहा...इतक्याच मोजक्या शब्दांत उत्तर दिले.
दरम्यान सयंक्त पत्रकार परिषदेत महत्वाच्या पाच कामांना आम्ही प्राधान्य देणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. नळाव्दारे नियमित पाणी आणि प्रदूषणमुक्त पणे करणार असल्याचे त्यांनी म्हटले. सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकमेकांच्या शेजारी बसले.
अजित पवार यांनी म्हटले की, शहरातील पर्यावरण, पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणार. नवीन शाळांना मान्यता दिली जाईल. शहरातील झोपडपट्टीचे पुर्ववसन केले जाईल. जाहीरनाम्याच्या माध्यमातून पुणेकरांना नेमके काय काय देता येईल याचे वाचन अजित पवारांनी केले असून मुलभूत सुविधा कशा वाढवता येतील, यावर अजित पवारांकडून भर देण्यात आला.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक अजित पवार भाजपासोबत लढणार असल्याची सुरूवातीला चर्चा होती. मात्र, शेवटी स्पष्ट झाले की, भाजपासोबत नाही तर दोन्ही राष्ट्रीवादी एकत्र येऊन निवडणुका लढतील. सुप्रिया सुळे यांनी अगोदरच स्पष्ट केली की, अजित पवार आणि माझ्यातील कौटुंबिक संबंध कायमच चांगले राहिले आणि ते कधीच दुरावले नाहीत. त्यांच्यात आणि आमच्यात कालही राजकीय मतभेद होते आणि आजही आहेत. सर्वच पक्ष अशाप्रकारची युती करून महापालिका निवडणुका लढत असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.