पिंपरी (पुणे) : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीत एकीकडे बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवरून मुद्दा तापलेला असतानाच दुसरीकडे प्रचारात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असं चित्र तीव्र होऊ लागलं आहे. भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या आरोपांची आठवण करून दिली आहे. यावरून पुणे पिंपरीमध्ये राजकीय वातावरण काहीसं तापल्याचं दिसून आलं. अशातच पुणे महापालिका निवडणुकीत १२५ जागा निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवणार्या भाजपसमोर सत्तेत मित्र पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मोठे आव्हान असणार आहे.
अजित पवार यांनी ऐन निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी केलेली युती आणि भाकरी फिरवल्याने १२५ जागा निवडून येण्याचे भाजपचे स्वप्न भंग होण्याची शक्यता असून पक्षाच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. यातच खासगी आणि शासकीय सर्व्हेंमध्येदेखील या निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील बड्या नेत्यांना चांगलेच फटकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत भाजपकडे २५०० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज केला होता. परंतु, भाजपने अनेक जुन्या लोकांना डावलत नव्या चेहर्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बंडखोरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी घेतली आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे भाजपच्या मिशन १२५ फटका बसण्याची शक्यता शासकीय आणि खासगी सर्व्हेंनी व्यक्त केली आहे. याचीच गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी नेत्यांची चांगलीच कानउघडणी केल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची कात्रज येथे जाहीर सभा झाली. सभेत मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली आहे. पण, सभा संपल्यानंतर बरीच राजकीय खलबतं झाल्याची दिसून आली.
तीन नेत्यांची बंददाराआड चर्चा
सोमवारी रात्री मुख्यमंत्री फडणवीस यांची कात्रज येथे जाहीर सभा झाली. सभेत मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली आहे. पण, सभा संपल्यानंतर बरीच राजकीय खलबते झाली. विमानतळाकडे जाताना मुख्यमंत्री फडणवीस, मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. त्यापूर्वी मुख्यमंत्री गाडीत बसल्यानंतर चंद्रकांत पाटील हे सुद्धा तेथे पोहोचले. चंद्रकांत पाटील आल्यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनी मोहोळ यांना आवाज देण्यास सांगितले. हे आदेश येताच चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या आवाजात अण्णा-अण्णा म्हणत त्यांना बोलावून घेतले. यानंतर विमानतळावर तीनही बड्या नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत मुखमंत्र्यांनी १६५ जागांचा आढावा घेतला. जिथे भाजपची स्थिती कमकुवत आहे किंवा जिथे सर्व्हेक्षणाचे निकाल विरोधात गेले आहेत, तिथे तातडीने राजकीय व्यूहरचना आखण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्र्यांनी घेतली भाजप नेत्यांची शाळा?
महापालिका निवडणुकीत १२० नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष ठेवलेल्या भाजपने निष्ठावंतांना डावलून आयातांना उमेदवारी दिल्याने काही प्रभागांतील जागा धोक्यात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रचार सभेसाठी पुण्यात आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील काही वरिष्ठ नेत्यांची शाळा घेतली असून धोकादायक जागांकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे.