मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू असतानाच या अपघातात विमानाचा ब्लॅक बॉक्स जळाल्याची माहिती काल (१७ फेब्रुवारी) रोजी नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली. मात्र, या माहितीनंतर अनेकांनी यावर ताशेरे ओढले. ब्लॅक बॉक्ससारखी यंत्रणा जळू कशी शकते असा सवाल उपस्थित केला जात असतानाच, आमदार रोहित पवार यांनीही यावर आक्षेप घेतला आहे. तसंच, या अपघाताशी संबंधित सर्वच शक्यतांबाबत आज त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले.
तपास यंत्रणांनी तपास सुरू केलाय, पण या तपासाचा वेग कमी आहे. मुंबई आणि दिल्लीतील पीसी झाल्यानंतर हा अपघात नसून घातपतच आहे, यावर लोकांचा विश्वास बसायला लागला आहे. वीसीआर कंपनीच्या बाबतीत मी दाखले दिले होते, त्यावर तज्ज्ञ बोलत आहेत. अधिकचे फ्युएल टँक त्या विमानात होते, अशीही शंका व्यक्त केली होती. ब्लॅक बॉक्ससंदर्भातही मी शंका उपस्थित केले होते. पण दुर्दैवं असं की नागरी उड्डाण मंत्रालयाने ब्लॅक बॉक्सचा काही भाग जळला असं पत्रक जारी केले, असं रोहित पवार म्हणाले.
विमानाचे बरेच स्फोट झाले होते. २०२३चं विमान मोठं होतं. हे विमान रनवेवर पडलं होतं. ते डांबरी होतं. पण दादांचं विमान साईडला पडलं. जर बॉल फरशीवर टाकला तर बाऊन्स जास्त होतो, पण मातीत टाकला तर कमी बाऊन्स होतो. तसंच, दादांचं विमान रनवेवर पडलं नाही, त्यामुळे त्याची वेलोसिटी कमी होती. मग स्फोट का झाला? त्यामुळे त्यात अधिकचे फ्युएल टँक होते, म्हणून स्फोट झाला ही आमची शंका खरी होत आहे. हे फ्युएल टँक टॉयलेटच्या बाजूला असतात. त्याच्याच मागच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो, असं रोहित पवार म्हणाले.