छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): जिल्ह्यात डायरीया आजाराचे प्रमाण वाढू नये, याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी १६ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत अतिसार थांबवा, स्टॉप डायरीया अभियान राबवल्या जात आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी एम यांनी केले आहे.
केंद्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार १६ जून पासून जुलै अखेरपर्यंत डायरिया थांबवा २०२६ स्टॉप अतिसार अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये उपलब्ध होणाऱ्या पाण्याची तपासणी एफटीके द्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये दूषित आढळलेले पाणी नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे तालुकास्तरावर या अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येऊन ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणां, सर्व विभाग या अभियानात सहभाग घेऊन आठवडा निहाय नियोजन करण्यात आले आहे.
गाव पातळीवर पाणी समितीची स्थापना, बळकटीकरण समितीद्वारे गाव पातळीवर पाण्याचे स्तोत्र स्वच्छता, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावे ओडीएफ प्लस करणे, गाव पातळीवर कार्यात्मक नळ जोडणी करणे, छतावरील पाणी संकलन हात पंप दुरुस्ती याबाबत प्रत्यक्ष गाव पातळीवर प्रभात फेऱ्या काढून जनजागृती करण्यात येणार आहे.
या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती सर्व शासकीय यंत्रणा यांनी सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.