सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा द्यावा, बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी : मुख्यमंत्री

Foto
नागपूर : बारामती पोटनिवडणूक बाबत असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना  पाठिंबा दिला पाहिजे, माझी अशी सर्वांना विनंती असेल. ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीने परिस्थिती होईल. यापूर्वीही महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केल्या आहेत. मला आठवते की जेव्हा आर.आर. आबांच दु:खद निधन झालं होतं त्याही वेळेस ती पोटनिवडणूक भाजप आणि आम्ही ठरवलं होतं की लढणार नाही आणि त्यावेळी ती बिनविरोध केली होती. मला वाटतं सर्वच पक्षांनी मन मोठं करून निवडणूक बिनविरोध केली पाहिजे. अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडसणवी (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.

नाशिक अपघातातीची घटना सर्वांना प्रचंड वेदना देणारी

नाशिक अपघातातील ती गाडी विहिरीत पडली, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्यावर फोनवर चर्चा केली आणि तेथील परिस्थिती देखील सांगितली. खरं म्हणजे इतक्या लहान मुलांचं यात दुर्दैवी निधन झालंय. ती जी विहीर आहे त्याला अतिशय छोटा कठडा होता आणि मध्यभागी ती विहीर होती त्यामुळे ही घटना घडल्याचा प्रथमदर्शनी त्या ठिकाणी लक्षात येते आहे. या संपूर्ण कुटुंबाच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो. आपण त्या लोकांना मदत घोषित केली आहे. पण त्यासोबत एक अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत की, रस्त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या विहिरी आहेत, जिथे कुठे रहदारी असेल तर तात्काळ त्याचं ऑडिटकरून त्याला आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील त्या कराव्यात. इथे असं लक्षात आलं की भिंत होती. पण ती छोटी होती. ती कदाचित मोठी असती तर ते वाचू शकले असते. त्यामुळे तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. ही घटना सर्वांना प्रचंड वेदना देणारी अशी आहे. अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्र्यानी दिली आहे.

बारामती आणि राहुरीचा पोटनिवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी :  30 मार्च 2026
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
मतमोजणी : 4 मे 2026
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026