मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमधील युतीसाठी चर्चेला गती आली असतानाच, अकोला महानगरपालिकेसाठी मात्र अद्याप प्रस्तावच नसल्याने, येथे या दोन पक्षांची युती होणार की नाही, याबाबत संभ्रम निमार्ण झाला आहे.
दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर याबद्दल माहिती देताना म्हणाले की, भाजपला रोखण्यासाठी मुंबई , नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर महानगरापालिका महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये युतीसाठी वंचितकडून प्रत्येकी ५० टक्के जागांचा फॉर्म्युला देण्यात आला आहे.
चर्चेतून तोडगा निघाल्यास आनंदच आहे. अकोल्यात मात्र अद्याप कुठलीही चर्चा नाही आणि काँग्रेसकडून तसा प्रस्ताव देखील प्राप्त नाही. इतर काही महानगरपालिकांत प्रस्ताव आल्यास हाच फॉर्म्युला आमच्याकडून कायम ठेवण्यात आला आहे, अशी वंचितची भूमिका असल्याचे पुंडकर यांनी स्पष्ट केले.
राज्यातील नगर परिषदांसह नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीही काँग्रेस आणि वंचित मध्ये युतीच्या घडामोडी सुरू झाल्या असून, त्यादृष्टीने सोमवार २२ नोव्हेंबर रोजी दोन्ही पक्षांत मुंबई येथे चर्चादेखील सुरू झाली.
अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी मात्र काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून युतीचा कोणताही प्रस्ताव वंचितकडे अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे अकोला महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती होणार की नाही, याबाबत सद्यःस्थितीत संभ्रम कायम असल्याचे चित्र आहे.
५०% फॉर्म्युल्यावर सहमतीनंतर होणार शिक्कामोर्तब?
मनपाच्या निवडणुकीत राज्यातील काही ठिकाणी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नागपूर, छत्रपती संभाजी नगरसह मुंबईत युतीसाठी दोन्ही पक्षांमध्ये सुरू झालेल्या चर्चेला गती आली आहे. त्यामध्ये युतीसाठी दोन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी ५० टक्के जागावाटपाचा फार्म्युला देण्यात आला.
चर्चेदरम्यान जागा वाटपाच्या या फार्म्युल्यावर सहमती झाल्यानंतर मनपाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचितमधील युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वंचितच्या विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली.