नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून विरोधक आणि सत्ताधार्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत आघाडीतील प्रमुख विरोधी पक्षांची बैठक होत आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाविरोधात देशव्यापी आंदोलनाची दिशा या बैठकीत निश्चित होण्याची शक्यता आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) सुप्रिया सुळे, आरजेडीचे तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती तसेच डाव्या पक्षांचे नेते बैठकीत सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे.
बैठकीतील प्रमुख मुद्दा मुळे मतदार यादीतून मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याचा विरोधकांचा आरोप हा आहे. याशिवाय निवडणूक आयोगाच्या कामकाजातील कथित मतभेद, -व्हीव्हीपॅट आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही चर्चा होणार आहे. विरोधी पक्ष संसदेत ज्ञानेश कुमार यांच्या हटविण्याच्या प्रस्तावासाठी खासदारांच्या स्वाक्षर्या गोळा करण्याबाबतही विचार करत असल्याचे वृत्त आहे. मात्र, आघाडीतील पूर्ण एकजूटही या बैठकीत दिसत नाही. आम आदमी पक्ष आणि डीएमके बैठकीपासून दूर आहेत. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव उपस्थित राहणार नसून त्यांच्या पक्षाचा प्रतिनिधी सहभागी होणार आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या कालच्या कार्यकारिणी बैठकीत विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर आंदोलन संसदेत आणि रस्त्यावर किती व्यापक पातळीवर नेले जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दोन पक्षांनी इंडिया आघाडीपासून स्वतःला दूर केले आहे. पूर्वी २३ पक्षांचा समावेश असलेल्या या आघाडीत आता २१ पक्ष उरले आहेत. आम आदमी पार्टी आणि द्रमुक या पक्षांनी आघाडीतून बाहेर पडत, इंडिया गटाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, अखिलेश यादव या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत; त्याऐवजी त्यांच्या वतीने हरेंद्र मल्लिक आणि मोहिबुल्ला नदवी या दोन खासदारांनी बैठकीत सहभाग घेतला.