बालकाच्या फुप्फुसात अडकलेला बदाम काढला यशस्वीपणे

Foto
सागर प्रकाशनचे साजवार्ता
घाटी रुग्णालयाच्या डॉक्टरांची कुशलता
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :
घराघरांमध्ये दिवाळीचा आनंद आणि फराळाची लगबग सुरू असताना, घाटी रुग्णालयात मात्र एका चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांची शर्थीची धडपड सुरू होती. अवघ्या एक वर्षाच्या बालकाच्या फुप्फुसात बदामाचा तुकडा अडकल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली होती. श्वास घेण्यास तीव्र त्रास होत असल्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले होते. अशा बिकट परिस्थितीतही दिवाळीच्या सुटीत घाटीतील डॉक्टरांनी तातडीने पुढाकार घेत 'ब्रॉन्कोस्कोपी'द्वारे फुप्फुसात अडकलेला बदाम यशस्वीपणे बाहेर काढला.
शनिवारी (दि.७) अचानक प्रकृती बिघडल्याने नातेवाइकांनी या बालकाला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान बदामाचा तुकडा श्वसनमार्गातून थेट फुप्फुसात गेल्याचे स्पष्ट झाले. बालकाचे लहान वय आणि श्वसनमार्गातील अडथळा लक्षात घेता डॉक्टरांनी तत्परता दाखवली. कान, नाक व घसा विभागाचे प्रमुख डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही किचकट प्रक्रिया पार पडली. या यशस्वी उपचारामध्ये बालरोग पथकप्रमुख डॉ. तृप्ती जोशी, बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. गणेश निकम, तसेच ईएनटी
Page No.: 8 Date: 11/11/2026
मुलांना सुकामेवा देणे टाळावे
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुके यांनी पालकांसाठी महत्त्वपूर्ण सावधगिरीचा इशारा दिला आहे. सणासुदीच्या काळात लहान मुलांना बदाम, काजू यासारखे कडक ड्रायफ्रूट्स देणे धोकादायक ठरू शकते, असे सांगत त्यांनी पालकांनी लहान मुलांना अख्खे सुकेमेवे देणे टाळावे, असे आवाहन केले आहे. डॉक्टरांच्या या समयसूचकतेमुळे बाळ आता पूर्णपणे बरे झाले असून, या सुदैवी घटनेमुळे संबंधित कुटुंबाने आनंदाने दिवाळी साजरी केली आहे.
विभागातील डॉ. गणेश मोहन, डॉ. ओमप्रकाश, डॉ. ऋतुजा, डॉ. वत्सल, डॉ. प्रशांत आणि अन्य निवासी डॉक्टरांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions